पुणे महापालिकेला जमत नसेल, तर 'जंबो' लष्करी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सोपवा!

Pune_Jumbo_Centre
Pune_Jumbo_Centre

पुणे : शहरातील विविध शासकीय रुग्णालयांत कोरोनाची चाचणी 24 तास करता येईल आणि महापालिकेच्या कोरोना केंद्रात कोणत्याही भागातील नागरिकांना चाचणी करता येईल, यासाठी आदेश द्यावा, अशी मागणी खासदार वंदना चव्हाण यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली. जंबो केंद्राचे व्यवस्थापन महापालिकेला जमत नसेल, तर ते लष्करी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात द्यावे, असेही त्यांनी सुचविले.

पुण्यामध्ये कोरोनाची चाचणी सायंकाळी किंवा रात्री करण्याची सुविधा काही खाजगी रुग्णालयांमध्ये आहे. परंतु शासकीय केंद्रांत चाचणी सेवा दुपारी 3 वाजता बंद करण्यात येते. सायंकाळी किंवा रात्री कोणाला शासकीय यंत्रणेमार्फत चाचणी करायची असेल, तर सध्या ती सेवा उपलब्ध नाही. यासाठी किमान ससून रुग्णालयात तरी, कोरोनाची चाचणी 24 तास सुरू ठेवावी. तसेच पुणेकरांना सध्या कोरानाची चाचणी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयनिहायच करावी लागते. कामानिमित्ताने बाहेर आलेल्या नागरिकांना ते शक्‍य होत नाही. त्यासाठी कुठल्याही सेंटरला ही चाचणी करता येईल, याची व्यवस्था प्रशासनाने करणे गरजेचे आहे, असे चव्हाण यांनी टोपे यांना सांगितले.

शिवाजीनगरमधील जंबो केंद्राचे व्यवस्थापन महापालिकेला जमत नसेल, तर लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात त्याचे व्यवस्थापन द्यावे. तसेच जंबो केंद्रात सुरक्षिततेच्या कारणास्तव खाजगी कंपन्यांचे बाऊंसर तैनात करण्यात आलेले आहेत. त्याचा त्रास रूग्णांच्या नातेवाईकांना झाल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. हवालदिल झालेल्या नातेवाईंकांची परिस्थिती संवेदनक्षमपणे हाताळण्याची गरज आहे. ही जबाबदारी पोलिस योग्य पद्धतीने पार पाडू शकतात. त्यामुळे तेथे बाऊंसरऐवजी पोलिस बंदोबस्त असावा, अशीही मागणी चव्हाण यांनी केली.

शहरात व्हेंटिलेटरची कमतरता आहे, त्यासाठी तातडीने नियोजन करण्याची गरज आहे. तसेच महापालिकेच्या डॅशबोर्डवर अद्ययावत माहिती मिळत नसल्याने नागरिकांची बेड मिळवण्यासाठी ओढाताण होत आहे. तसेच अत्यवस्थ रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यास अडचणी येत आहे. त्यासाठी डॅशबोर्डमध्ये तातडीने सुधारणा करावी, त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील कोरोना आटोक्‍यात आणण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांनी विधानभवन येथे शनिवारी बैठक आयोजित केली होती. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच कॅबिनेट मंत्री दिलिप वळसे-पाटील आणि राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, विविध खासदार, आमदार, महापालिका आणि जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि नॅशनल सेंटर फॉर डिसिज कंट्रोलचे (एनसीडीसी) संचालक डॉ. सुजितकुमार सिंग आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. तेथे पुण्यातील परिस्थितीबाबत आणि करावयाच्या उपाययोजना चव्हाण यांनी टोपे यांना सुचविल्या.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com