बारामती तालुका टॅंकरमुक्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 मे 2018

सांगवीः बारामती तालुक्‍यामध्ये पवार कुटुंबीयांतर्फे जिरायती भागात पाणी प्रश्‍नावर मोठे काम झाले आहे. त्यामुळे यंदा बारामती तालुका टॅंकरमुक्त झाल्याचे समाधान बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले यांनी व्यक्त केले.

सांगवीः बारामती तालुक्‍यामध्ये पवार कुटुंबीयांतर्फे जिरायती भागात पाणी प्रश्‍नावर मोठे काम झाले आहे. त्यामुळे यंदा बारामती तालुका टॅंकरमुक्त झाल्याचे समाधान बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले यांनी व्यक्त केले.

गेल्या वर्षी बारामती तालुक्‍यामध्ये 23 टॅंकरने 126 वाड्या वस्त्यांना पाणी टंचाईमुळे पाणीपुरवठा केला जात होता; परंतु गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने चालू वर्षी तालुक्‍यातील जिरायती भागात अद्याप एकाही टॅंकरची गरज पडली नाही. याचे संपूर्ण श्रेय तालुक्‍यामध्ये पाणी समस्येवर पवार कुटुंबीयांनी केलेल्या कामाला जात असल्याची माहिती सभापती संजय भोसले यांनी दिली. बारामती तालुक्‍यातील जिरायती भागातील पाणी समस्या सोडविण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेवरून अनेक सामाजिक संस्थांनी पाणी टंचाई दूर करण्यासाठी ओढा खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामात पुढाकार घेतला. यामध्ये एन्व्हॉयरलमेंटल ऑफ फोरम, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शरयू फौंडेशन, कृषी विज्ञान केंद्र, सकाळ रिलीफ फंड, जलयुक्त शिवार यांच्यासह तालुक्‍यातील अनेक स्वयंसेवी संस्थांनी मोठे योगदान दिले. त्यामुळेच बारामती तालुका चालू वर्षात टॅंकरमुक्त झाला आहे. जिरायती भागात पवार कुटुंबीयांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या भरीव कामामुळेच तेथील पाणी समस्या सुटण्यास मदत झाली आहे. जिरायती भागात मोठ्या प्रमाणात ओढा खोलीकरण व रुंदीकरण झाल्यामुळे त्या परिसरातील विहिरींना भर उन्हाळ्यातही पाणी आढळून येत आहे. तरीही चालू वर्षात उन्हाच्या तीव्रतेमुळे काही ठिकाणी पाण्याची गरज निर्माण झाल्यास त्या ठिकाणी पाणी टॅंकरची व्यवस्था करणे सोपे होणार आहे. गेल्या अनेक वर्षात बारामती तालुका प्रथमच टॅंकरमुक्त झाल्याचे समाधान बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Baramati taluka tanker free