pawar-k.jpg
pawar-k.jpg

बारामतीकर पवार साहेबांसोबतच...

बारामती शहर : आज सकाळी फडणवीस व अजित पवार यांच्या शपथविधीनंतर संपुर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या पत्रकारपरिषदेनंतर बारामतीकरांनी आपण पवार साहेबांसोबत असल्याच्या प्रतिक्रीया दिल्या . 

आज पहिल्यादांच बारामतीत शरद पवार की अजित पवार कोणाच्या बाजूने तुम्ही असा प्रश्न विचारण्याची वेळ पत्रकारांवरही आली होती. गेल्या अनेक वर्षांच्या राजकारणात शरद पवार हेच आपले गॉडफादर अशी सातत्याने भूमिका घेणाऱ्या अजित पवार यांनी शरद पवारांना अंधारात ठेवून भाजपला पाठिंबा देत थेट शपथ घेतली, यावर बारामतीतील कोणाचाच विश्वासच बसत नव्हता.

अजूनही कार्यकर्त्यांना नेमके काय राजकारण घडते आहे, हेच समजेनासे झाले आहे. दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या व्हॉटसअँप स्टेट्सवर जी भूमिका मांडली त्या नंतर बारामतीत ख-या अर्थाने सन्नाटा पसरला. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले याचा आनंद साजरा करण्याचे धाडसच कार्यकर्त्यांचे झाले नाही. आज पहिल्यादांचा शरद पवार की अजित पवार अशी निवड करण्याची वेळ येतेय की काय अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे वातावरण सुन्न होते. 

दरम्यान शरद पवार यांना अजित पवार यांनी अंधारात ठेवून हा निर्णय घेतल्याचे जाहीरपणाने सांगितल्यानंतर मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गोची झाली आहे. उघडपणे कोणी बोलायला तयार नाहीत.  बारामतीकरांनी शरद पवार यांच्यासोबत असल्य़ाचे सांगितले.  

आज बारामतीतील दैनंदिन कामकाजावरही या घटनेचा चांगलाच परिणाम झालेला दिसला. बारामतीतील लोक हे सतत टीव्हीसमोर बसून होते. अनेकांनी थेट अजित पवारांना फोन करुन संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. अजित पवारांच्या शपथविधीची दृश्ये बारामतीकरांना धक्का देणारी होती. 

कौटुंबिक कलहाची व्यथा...
या निमित्ताने पवार कुटुंबियात कौटुंबिक कलह सुरु झाला की काय या शंकेने अनेक जुने जाणते कार्यकर्तेही व्यथित झाल्याचे पाहायला मिळाले. पवारसाहेबांचे वय विचारात घेता या वयात त्यांना काय काय पाहावे लागणार देवालाच माहिती....अशी अत्यंत बोलकी प्रतिक्रीया एका कार्यकर्त्याने दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com