बारामतीतही एसटीचे तेरा कर्मचारी निलंबित | ST Employee | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

st strike
बारामतीतही एसटीचे तेरा कर्मचारी निलंबित

बारामतीतही एसटीचे तेरा कर्मचारी निलंबित

sakal_logo
By
मिलिंद संगई,

बारामती - एसटीच्या राज्यव्यापी संपाच्या निलंबनाचे पडसाद बारामतीतही उमटले आहेत. बारामती व एमआयडीसी या दोन आगारातील 13 कर्मचा-यांना राज्य परिवहन मंडळाने निलंबित केले आहे. आगारप्रमुख अमोल गोंजारी यांनीही याला दुजोरा दिला आहे.

राज्यस्तरावर राज्य शासनाने एसटी कर्मचा-यांच्या संपाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यातच निलंबनाची कारवाई सुरु झाली असून बारामती व एमआयडीसी आगारातील सात वाहक व सहा चालक अशा तेरा जणांवर निलंबनाची कारवाई झाली आहे.

संपामध्ये सहभाग नोंदविणे, इतर कर्मचा-यांना काम करण्यास मज्जाव करणे, काम बंद ठेवणे, समाजमाध्यमातून महामंडळाची बदनामी होईल असा मजकूर प्रसिध्द करणे अशा विविध कारणांसाठी ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा: कोथरुड : चांदणी चौकातील वाहतूक समस्येवर तोडगा कधी निघणार

बारामती आगारातून काल (ता. 11) जवळपास 23 खाजगी वाहनातून प्रवाशांची वाहतूक झाली. आजही बारामतीच्या बसस्थानकावर जीप, मिनी बस, बस, इको गाडयांतून प्रवासी वाहतूक सुरु होती. प्रवास हा महागडा असला तरी ज्यांना प्रवास अनिवार्य आहे त्यांनी जादा पैसे मोजून या वाहनातून प्रवास केला.

बारामतीहून सर्वाधिक वाहतूक दररोज पुण्याला असते. बारामती पुणे एकेरी प्रवासासाठी तब्बल 400 रुपयांचे शुल्क आकारले जात असतानाही अनेकांना नाईलाजास्तव हा प्रवास केला. मात्र हा संप लवकर संपावा व एसटीची सेवा सुरळीत व्हावी अशी प्रवाशांची मागणी आहे.

बारामती बसस्थानकावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये या साठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून बारामतीतील कर्मचा-यांनीही संयमाची भूमिका घेतली आहे. वरिष्ठ अधिकारी संपावरील कर्मचा-यांची मनधरणी करत असले तरी राज्यस्तरावर जो निर्णय होईल, त्याचेच पालन होईल अशी कर्मचा-यांची भूमिका आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचा-यांना शासकीय सेवेत विलिन करुन घ्यावे या प्रमुख मागणीवरुन संप पुकारला गेला आहे.

loading image
go to top