पुणे ग्रामीणमध्ये घरात नाही रेंज आणि बाहेर जावे तर अंगावर येतोय बिबट्या

नवनाथ भेके
Sunday, 18 October 2020

आंबेगाव तालुक्यातील गांजवेवाडी परसीरातील विदयार्थ्यांच्या आॅनलाईन शिक्षणाला रेंजअभावी खीळ बसली आहे.

निरगुडसर : आॅनलाईन शिक्षण घ्यायचंय पण घरात रेंज नाही, बाहेर कुठे उंच ठिकाणी डोंगरावर जावे तर परिसरात जंगल व ऊसाचे क्षेत्र असल्याने बिबट्यांची भीती. त्यामुळे आता करायचं तरी काय? असा प्रश्न आंबेगाव तालुक्यातील गांजवेवाडी परसीरातील विदयार्थ्यांना पडला आहे.  रेंज अभावी आॅनलाईन शिक्षणाला खीळ बसली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

साधारण एक हजाराहून अधिक लोकसंख्या असणारे आंबेगाव तालुक्यातील गांजवेवाडी ही वस्ती, टाॅवर असणा-या दोन्ही बाजूला भला मोठा डोंगर तर तिसरीकडे वनविभागाचा जंगलाचा भाग यामुळे घरात मोबाईलची रेंज मिळत नसल्याने या वस्तीवरील १०० हून अधिक शालेय विदयार्थ्यांना आॅनलाईन घराबाहेर उंच ठिकाणी रस्त्यावर जाऊन शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहे.

'अंतिम'च्या परीक्षेची अडचणी पाठ सोडेनात; मराठीच्या पेपरमधून पर्यायच झाले गायब!​

सध्या कोरोना रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शाळा बंद करुन ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरु आहे. शालेय विद्यार्थ्यांना अक्षरक्षः मोबाईलची रेंज शोधत कुठेतरी डोंगरावर किंवा अडचणीत जावे लागते, या परिसरात उसाचे क्षेत्र अधिक असून सतत बिबटे, इतर वन्यप्राण्यांचा देखील वावर आहे. त्याचा परिणाम आता विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत आहे.

कोरोनाचा सर्वाधिक फटका शिक्षण क्षेत्राला बसल्याने सर्वत्र शाळा बंद आहेत. सरकारने ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरू केली. परंतू ग्रामीण भाग मात्र यामध्ये झाकोळून गेला, अद्यापही अनेक विदयार्थ्यांकडे मोबाईल नाही काहींकडे मोबाईल आहेत तर रेंज नाही अशाप्रकारे अनेक सुविधांचा अभाव खेडोपाडी, वाडी वस्त्यांवर आहे त्याचा फटका आता शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे.

अशाच प्रकारे आंबेगाव व जुन्नर या दोन्ही तालुक्यांच्या सरहद्दीवर असलेल्या गांजवेवाडीत अद्यापही विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचितच आहेत. गांजवेवाडीत अनेक शालेय विद्यार्थी गेले सात आठ महीन्यांपासून या ऑनलाईन शिक्षणामुळे त्रास सहन करत आहेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष हे पुर्णपणे वाया जाण्याची भिती आता पालकांमधून व्यक्त होत आहे.आता ऑनलाईन परिक्षांचे दिवस सुरू झाले असून मुले रेंजच्या शोधात कुठे टेरेसवर,खिडकीत अभ्यासाला बसतात. मुलांना याचा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

गांजवेवाडी परीसरात मोबाईल रेंज नसल्याने नागरीकासह विदयार्थ्यांना ञास सहन करावा लागत आहे. त्यामध्ये सध्या सुरु असलेल्या आॅनलाईन शिक्षण पद्धतीलाही फटका बसला आहे. मोबाईलला रेंज नसल्याने विदयार्थ्यांना घरातून बाहेर बाहेर रेंज शोधावी लागत आहे. परंतु बाहेरही जंगलाचा मोठा परीसर असल्याने बिबटयाचा वावर मोठा असून, भीतीचे वातावरण आहे. तरी याठिकाणी तातडीने मोबाईल टॅावर उभारावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बो-हाडे यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विदयार्थी सत्यम गांजवे म्हणाला, ''गांजवेवाडीत नेटवर्क नाही. त्यामुळे अभ्यास करता येत नाही. मग कुठे तरी डोंगर, जंगलात अडचणीत जाऊन मोबाईलला रेंज शोधावी लागत आहे. तिथे पण वन्यप्राणी, बिबटयांचा वावर असल्याने  भीती वाटते. त्यामुळे आमच्या वस्तीवर तातडीने टॅावर उभारण्याची गरज आहे.''

(संपादन : सागर दिलीपराव शेलार) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Barriers to online learning lack of mobile range