'ते' विद्यार्थी अडकले होते दिल्लीत, पण बार्टीने....

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

सामाजिक न्याय विभाग व बार्टीच्या विशेष प्रयत्नांमुळे दिल्लीत अडकलेल्या यूपीएससीच्या विद्यार्थ्यांचा परतीचा प्रवास सुलभ झाला.

विश्रांतवाडी : सामाजिक न्याय विभाग व बार्टीच्या विशेष प्रयत्नांमुळे दिल्लीत अडकलेल्या यूपीएससीच्या विद्यार्थ्यांचा परतीचा प्रवास सुलभ झाला.

- विद्यार्थ्यांनो, परीक्षा रद्द केल्यास 'कोरोना बॅच'चा शिक्का मारला जाणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ), पुणेतर्फे दरवर्षी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित  जातींमधील आर्थिक व सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गातील २०० विद्यार्थ्याना दिल्लीमध्ये यूपीएससीच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पूर्वप्रशिक्षणासाठी पाठवले जाते. त्याकरिता प्रतिविद्यार्थी रु. दोन लाख सव्वीस हजार  इतकी रक्कम बार्टीतर्फे देण्यात येते. याव्यतिरिक्त दरमहा १२००० प्रत्येक विद्यार्थ्यास निवास व भोजन व्यवस्थेकरिता निर्वाह भत्ता म्हणून 10 ते 11 महिने दिला जातो. सन  2015 पासून सन 2020 पर्यंत 700 पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घेतला आहे
यावर्षीच्या  विद्यार्थ्यांचा कोचिंगचा कालावधी दि. 15 मे 2020 रोजी पूर्ण झाला. मात्र कोरोनाच्या संकटामुळे दि.  31 मे 2020 ची पूर्वनियोजित स्पर्धा परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे लॉकडाऊनमुळे दिल्लीत अडकलेल्या  बार्टीच्या या  विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतील आपापल्या घरी सुखरूप पोहोचविण्यासाठी बार्टीचे महासंचालक कैलास कणसे याना विनंती केली.

- आता महिलाही मशिदीत नमाज अदा करणार? सुप्रीम कोर्टाने केंद्रासह वक्फबोर्डाला पाठवली नोटीस

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या मागणीचा तत्काळ विचार करून कैलास कणसे यांनी  सर्व सूत्रे हलविण्यास सुरुवात केली. महासंचालक यांच्या प्राप्त सुचनांनुसार बार्टीच्या यूपीएससी विभागाचे लालासाहेब जाधव, प्रकल्प संचालक तथा सेवानिवृत्त अव्वर सचिव, मंत्रालय, मुंबई यांच्या मदतीने व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्री धनंजय मुंडे आणि मुख्य सचिव पराग जैन नैनुटिया यांच्या विशेष प्रयत्नांमुळे दिल्ली येथून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील 1400 विद्यार्थ्याना परत आणण्याकरिता सोडण्यात आलेल्या विशेष रेल्वेगाडीमध्ये बार्टीच्या 86 विद्यार्थ्यांची सोय करण्यात आली. 

महाराष्ट्राच्या ज्या जिल्ह्यांमधील हे विद्यार्थी होते तेथील जिल्हाधिकार्‍यांना लेखी पत्र देऊन व समतादूतांकरवी प्रत्यक्ष संपर्क करून   रेल्वेस्टेशनवरून त्यांची एसटीव्दारे प्रवासाची सोय  करण्यात आली.  विद्यार्थी रेल्वेस्थानकावर  उतरल्यापासून त्यांच्या आरोग्य तपासणीच्या प्रक्रियेत सुलभता आणण्यापासून ते त्यांच्या गावांमधील त्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया  सुकर  करण्यापर्यंत बार्टीचे निबंधक यादव गायकवाड, यूपीएससी. विभागाचे प्रकल्पसंचालक  लालासाहेब जाधव  आणि समतादूत विभागाच्या मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे  यांच्या आदेशानुसार नियुक्त समतादूत  यांनी  पदोपदी विद्यार्थ्यांना मदत केली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोल्हापूर येथील बार्टीचा विद्यार्थी  वैभव कांबळे याने सांगितले, ''या वर्षातील स्कॉलरशिप १५ मे, २०२० रोजी संपली असतानाही बार्टीचे महासंचालक कणसेसर यांनी विद्यार्थ्यांच्या निर्वाहभत्त्याची मुदत ३१ मे, २०२० पर्यंत वाढवून विद्यार्थ्याना आर्थिक मदत केली. तसेच लॉकडाउनमुळे दिल्लीमध्ये विद्यार्थी अडकलेल्या आम्हा सर्व विद्यार्थ्याना सर्व प्रकारची  मदत करून  सुखरूप आपल्या गावी पोहोचवले.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BARTI special efforts made the return journey of UPSC students from Delhi easier