Pune : 'बॅटरीबाबत देशाला आत्मनिर्भर बनविणार' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

'बॅटरीबाबत देशाला आत्मनिर्भर बनविणार'

sakal_logo
By
सम्राट कदम @namastesamrat

पुणे : इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरण्यात येणारी अॅडव्हान्स केमिस्ट्री सेल (एसीसी) बॅटरी ही भारतात तयार होत नाही. ती बाहेरून आयात करावी लागत असल्याने इलेक्ट्रिक वाहनांच्या एकूण किंमतीपैकी ३० टक्के किंमत ही केवळ बॅटरीचीच होते. येत्या काळात बॅटरीच्या बाबतीत देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रयत्न करणार, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योग मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांड्ये यांनी दिली.

केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाने ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय), सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफ्रक्चरर्स (एसआयएएम) आणि ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंट मॅन्युफ्रक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया (एसीएमए) यांच्या सहकार्याने सेनापती बापट रस्त्यावरील एमसीसीआयए येथील बजाज आर्ट गॅलरी या ठिकाणी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये पुण्यातील उद्योग क्षेत्रास प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंन्टिव्ह स्कीमची माहिती देत उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी डॉ. पांडे यांनी चर्चा केली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्रालयाचे सहसचिव अमित मेहता, एआरएआयचे संचालक डॉ. रेजी मथाई, एसआयएएमचे कार्यकारी संचालक प्रशांत बॅनर्जी आदी या वेळी उपस्थित होते.

चार्जिंग वेळ घटविण्यासाठी संशोधन करावे

बॅटरीचे देशात उत्पादन करण्यासाठी प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंन्टिव्ह (पीआयएल) योजना आणि फास्टर अॅडॉप्शन अॅण्ड मॅन्युफ्रॅक्चरिंग ऑफ हायब्रीड इलेक्ट्रिक व्हेईकल (एफएएमई) योजना यांच्या प्रभावी अंमलबजावणी बरोबरच वाहनांमधील बॅटरी चार्जिंगचा वेळ कमी व्हावा, या दृष्टीने पुण्यातील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) ने संशोधन करावे, असे आवाहन पांड्ये यांनी केले.

हेही वाचा: तरुण पिढीपर्यंत साहित्य पोचविण्यात आमची पिढी अपयशी ठरली : जावेद अख्तर

कार्गो विमानतळासाठी मंत्र्यांशी बोलणार.

पुण्यातील औद्योगिक विकासाठी नागरी विमानतळ आणि मालवाहू कार्गो टर्मिनलची आवश्यकता आहे. यासाठी नागरी विमान उड्डाण मंत्र्यांशी वैयक्तिक चर्चा करत कार्गो टर्मिनलचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन डॉ. पांड्ये यांनी दिले.

इलेक्ट्रिक वाहनांचा वापर देशात वाढावा, या दृष्टीने केंद्र सरकारने सुरू केलेल्या विविध योजना व अनुदानामुळे गेल्या काही महिन्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. नजीकच्या भविष्यात ही वाढ कायम राहणार असून इलेक्ट्रिक वाहनांच्या जादा किंमती आणि बॅटरी चार्जिंग या दोन्हीसमस्या सोडविण्याच्या दिशेने सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

- डॉ. महेंद्रनाथ पांड्ये, अवजड उद्योग मंत्री

loading image
go to top