पावसाळ्यात डेंगीपासून सावधान 

डॉ. क्षितिजा कुलकर्णी 
गुरुवार, 19 जुलै 2018

एडीस इजिप्ती या डासामार्फत डेंगीचे विषाणू पसरतात. निरोगी व्यक्तीस डास चावल्यानंतर काही दिवसांनी या विषाणूंची संख्या वाढल्यावर त्या व्यक्तीमध्ये डेंगीची लक्षणे दिसतात. ही लक्षणे ३ ते ७ दिवस दिसतात.

डेंगी आजार डेंगी विषाणू (व्हायरस)मुळे होतो. डेंगीचे ४ वेगवगळे विषाणू आहेत. ते एडीस इजिप्ती या डासामार्फत पसरतात. हे डास स्वच्छ पाण्यामध्ये राहतात. या डासांवर असलेल्या काळ्या व पांढऱ्या पट्ट्यांमुळे हे डास लगेच ओळखू येतात. हे डास दिवसासुद्धा चावतात.

डेंगी झालेल्या रुग्णामध्ये हे विषाणू असतात. जेव्हा एडीस इजिप्ती या जातीचा डास डेंगीच्या रुग्णास चावतो तेव्हा हे विषाणू डासामध्ये प्रवेश करतात. काही दिवस डासामध्ये त्यांची वाढ होते. मग जेव्हा हे डास दुसऱ्या निरोगी व्यक्तीस चावतात तेव्हा हे विषाणू त्या व्यक्तीमध्ये प्रवेश करतात. काही दिवसांनी या विषाणूंची संख्या वाढल्यावर त्या व्यक्तीमध्ये डेंगीची लक्षणे दिसतात. ही लक्षणे ३ ते ७ दिवस दिसतात.

लक्षणे
 खूप जोरात थंडी वाजून ताप येणे. तापाचे प्रमाणही अधिक असते.
अंग, स्नायू, हाडे व सांधे खूप दुखतात.
अशक्तपणा, थकवा येणे. भूक खूप कमी होणे काहीवेळा उलटी होणे, पोटात दुखणे अशी लक्षणेसुद्धा दिसतात.
गळा/घसा दुखणे, हलकी सर्दी, खोकला काही जणांमध्ये दिसतात. नाडीचे ठोके हळू पडतात.
अंगावर लाल रंगाचे पुरळ येतात. चेहरा छाती, पोट, पाठ व हळूहळू सर्व अंगावर ते पसरतात.
गंभीर आजारामध्ये रुग्णाला रक्तस्त्राव होणे, त्वचेखाली रक्तस्त्राव होणे.
 खूप गंभीर आजारामध्ये नाडी जलद व कमजोर होतात. रक्तदाब (बीपी) कमी होतो. रुग्णाचे अंग थंड पडते. हळूहळू भान व शुद्ध हरपते

प्रतिबंधात्मक उपाय
डासांचे प्रजनन रोखणे व डासांना चावण्यापासून प्रतिबंध करणे हे दोन महत्त्वाचे प्रतिबंधात्मक उपाय आहेत. डेंगीचे डासांच्या अळ्या स्वच्छ व स्थिर, साठलेल्या पाण्यामध्ये वाढतात. त्यामुळे असे पाणी साठू न देणे हा सर्वात महत्त्वाचा व परिणामकारक उपाय आहे. यासाठी रिकामे टायर, डब्बे, छोटी डबकी, तुंबलेल्या गटारी, परिसरात व गच्चीमध्ये साठेलेले पाणी आठवड्यातून एकदा रिकामे करणे आवश्यक आहे. तसेच घरातील टाक्या, पिंप, हंडे, फ्लॉवरपॉट, फ्रिजच्या खालचा ट्रे, कुलर्स हे सुद्धा आठवड्यातून एकदा रिकामे करावे. ज्या टाक्या वगैरे रिकामे करणे शक्य नाही त्यांना घट्ट झाकणाने बंद करावे. खिडक्या व दारांना जाळी बसवावी. खास करून लहान मुलांना अंग पूर्णपणे झाकेल असे कपडे वापरावे. शक्य झाल्यास डेंगीच्या रुग्णास स्वतंत्र मच्छरदाणीमध्ये सुरवातीचे ५ ते ७ दिवस झोपवावे.

उपचार
डेंगीकरिता लक्षणाप्रमाणे व आजाराच्या तीव्रतेनुसार उपचार आहेत. याकरिता आपण डॉक्टरांना दाखवणे व गरजेनुसार रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. प्लेटलेटच्या पेशी डेंगीच्या बऱ्याच रुग्णांमध्ये कमी होतात. पण या पेशी भरण्याची गरज अगदी क्वचित भासते.
तापाकरिता पेरासिटामोल (paracitamol) एसिटामिनोफेन (acetaminophen) ही औषधे चालतात. तापाकरिता एस्पिरिन (aspirin), ब्रुफेन (brufen), कॉम्बिफ्लाम (combiflam) अशी औषधे  चालत नाहीत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार करू नयेत.

अाहार
आहार पचण्यास हलका ठेवावा. पाणी व इतर पातळ पदार्थ जसे ज्युस, सुप वगैरे  जास्तीत जास्त घ्यावे. डेंगीकरिता कोणताही विशेष आहार नाही. किवी, संत्री, मोसंबी, पपई, किंवा इतर कुठल्याही फळांनी पेशी लवकर वाढत नाहीत. संतुलित आहार व व्यायाम असण्याऱ्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती चांगली असते. अशा व्यक्तीस डेंगीचा व असे इतर अनेक आजार गंभीर रूप घेण्याची शक्यता थोडी कमी असते. याकरिता कोणतीही लस उपलब्ध नाही.

(लेखिका दौंड, जि. पुणे येथे आयसीयू तज्ज्ञ आहेत.)

Web Title: Be careful of dengue in the rainy season