खबरदारी घ्या अन 'कॅशलेस' व्हा

अनिल सावळे  - @ AnilSawale
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

पुणे - तुम्ही हॉटेलात, पेट्रोल पंपावर डेबिट किंवा क्रेडिट कार्डाने बिलाचे पैसे अदा करता... एटीएम सेंटरमध्ये एकटेच असल्याने पिन टाईप करून पैसे काढता... असे करताना तुम्ही बिनधास्त, निश्‍चिंत असता. मात्र, हीच आपली बेफिकिरी आपल्याला भोवणार असते... तुमच्या कार्डवरील क्रमांक- तुम्ही एंटर केलेला पिन छुप्या कॅमेऱ्याने टिपला जातो किंवा एखाद्या विक्रेत्याकडूनसुद्धा कार्डवरील माहिती घेतली जाते आणि काही दिवसांतच तुमच्या खात्यातून मोठी रक्कम गायब होते.

पुणे - तुम्ही हॉटेलात, पेट्रोल पंपावर डेबिट किंवा क्रेडिट कार्डाने बिलाचे पैसे अदा करता... एटीएम सेंटरमध्ये एकटेच असल्याने पिन टाईप करून पैसे काढता... असे करताना तुम्ही बिनधास्त, निश्‍चिंत असता. मात्र, हीच आपली बेफिकिरी आपल्याला भोवणार असते... तुमच्या कार्डवरील क्रमांक- तुम्ही एंटर केलेला पिन छुप्या कॅमेऱ्याने टिपला जातो किंवा एखाद्या विक्रेत्याकडूनसुद्धा कार्डवरील माहिती घेतली जाते आणि काही दिवसांतच तुमच्या खात्यातून मोठी रक्कम गायब होते.

सायबर चोऱ्यांचे प्रमाण लक्षणीय झाले आहे. बॅंकांच्या डेबिट, क्रेडिट कार्डवरील क्रमांक विचारून अथवा चोरून नागरिकांना ५४ लाख रुपयांना लुबाडल्याच्या घटना गेल्या वर्षभरात घडल्या. अशा ४७१ तक्रारी आल्या असून, हे प्रमाण २७ टक्‍के आहे. खबरदारी घ्या अाणि ‘कॅशलेस’ व्हा, असे आवाहन सायबर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना केले.

नुकत्याच घडलेल्या प्रातिनिधिक घटना

1) औंध येथील दानेश बबुता यांना मोबाईलवर बॅंक खात्यातून ५८ हजार ७९८ रुपयांची खरेदी झाल्याचा एसएमएस आला. ही रक्‍कम पेटीएम, पे यू, सुविधा डॉट कॉम आणि व्होडाफोन बिलडेस्कच्या माध्यमातून गेली होती. दानेश यांनी स्वत: हा व्यवहार न करताही बॅंक खात्यातून रक्‍कम गेली. याप्रकरणी सायबर पोलिसांनी नवी मुंबईतून दोन नायजेरियन नागरिकांना अटक केली. या दोघांनी मेट्रोमोनी संकेतस्थळावर महिलांना लग्नाची मागणी करून गिफ्टच्या बहाण्याने लुबाडल्याचेही तपासात समोर आले.

2) बनावट क्रेडिट, डेबिट कार्ड तयार करून लुटणाऱ्या टोळीला सायबर गुन्हे शाखेने मुंढवा परिसरात अटक केली. केरळ राज्यातील तीन आरोपींकडून क्रेडिट कार्ड तयार करणारे मशीन, स्किमर, नऊ क्रेडिट कार्ड, मोबाईल जप्त करण्यात आले. ही टोळी कार्ड क्‍लोनिंग करून ऑनलाइन खरेदी करीत होती.

अशी घ्या काळजी...

 • कोणतीही बॅंक क्रेडिट, डेबिट कार्डवरील माहिती विचारत नाही, ती कोणालाही सांगू नये
 • एमटीएम सेंटर किंवा मशिनमध्ये छुपा कॅमेरा, स्किमर नसल्याची खात्री करा
 • एटीएमचा पिन टाकताना योग्य खबरदारी घ्या 
 • हॉटेलमध्ये बिल देताना स्वत: पिन क्रमांक टाकावा
 • खात्रीशीर संकेतस्थळावरूनच ऑनलाइन खरेदी करावी
 • ऑनलाइन खरेदी करताना व्हर्च्युअल की-बोर्ड वापरावा
 • सार्वजनिक वायफायच्या ठिकाणी ऑनलाइन खरेदी टाळा
 • बॅंकेकडे एसएमएस अलर्टसाठी मोबाईल क्रमांक नोंदवावा
 • यूझरनेम आणि पासवर्ड नेहमी बदलत ठेवावा
 • ऑनलाइन बॅंकिंग झाल्यानंतर लॉगआउट विसरू नका

फसवणूक टाळा...

 • बॅंकेतून बोलत असल्याचे सांगून क्रेडिट आणि डेबिट कार्डवरील १६ आकडी क्रमांक विचारला जातो. सीसीव्ही क्रमांक अथवा कार्डची मुदत संपण्याची तारीख आणि एक्‍सपायरी डेट विचारली जाते. ती सांगितल्यानंतर तुमच्या बॅंक खात्यातून ऑनलाइन बॅंकिंगद्वारे खरेदी किंवा एटीएममधून पैसे काढून घेतले जातात.
 • बॅंकेत बनावट कागदपत्रे सादर करून क्रेडिट कार्ड घेऊन फसवणूक केली जाते.
 • एटीएम सेंटरमध्ये छुपा कॅमेरा लावून कार्डचा डेटा चोरला जातो. तो डेटा वापरून बनावट कार्ड तयार केले जाते.
 • हॉटेल, बार रेस्टॉरंटमध्ये पोर्टेबल मशिनवरून डेटा चोरीची शक्‍यता
 • मालवेयर सॉफ्टवेयर टाकल्यानंतर आपल्या मोबाईल अथवा संगणकावरील हालचाली त्या व्यक्‍तीस दिसतात. त्यावरून युजरनेम, पासवर्डची माहिती घेऊन ऑनलाइन बॅंकिंगद्वारे फसवणूक केली जाते.

फसवणूक झाल्यास?
संपर्क करा (सायबर गुन्हे शाखा) 
 ०२०-२६१२३३४६

डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नागरिकांनी स्वत: योग्य ती खबरदारी घेतल्यास फसवणूक टाळता येईल. अशी घटना घडल्यास नागरिकांनी संबंधित बॅंकेशी तातडीने संपर्क साधून कार्ड बंद करावा. तसेच, सायबर गुन्हे शाखेतील पोलिस अधिकाऱ्यांशीही संपर्क साधावा.
- सुनील पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर गुन्हे शाखा

Web Title: Be careful to take an cashless