शेतकरी जखमी

शेतकरी जखमी
Published on

अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
--
दगडथरमध्ये दीड महिन्यातील दुसरी घटना
--

ॲग्रोवन वृत्तसेवा
यवतमाळ : महागाव तालुक्यातील दगडथर गावात अस्वलाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याला गंभीर दुखापत झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे, गेल्या दीड महिन्यातील ही दुसरी घटना असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आणि चिंतेचे वातावरण आहे. दगडथर येथील शिवाजी परसराम खराटे (वय ४६) हे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास भावाच्या शेतातून बैल आणावयास जात असताना झुडपात दबा धरून बसलेल्या अस्वलाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढविला. प्रत्यक्षदर्र्शी आणि ग्रामस्थांच्या माहितीनुसार, अस्वलाने झडप घालत त्यांच्या शरीराच्या पार्श्वभागावर गंभीर जखमा केल्या. हल्ल्याची तीव्रता इतकी होती की, खराटे रक्तबंबाळ अवस्थेत घटनास्थळी कोसळले. आरडाओरड ऐकून ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी खराटे यांना प्रथम उमरखेड येथील रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. डॉक्टरांकडून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. शिवाजी खराटे यांच्या मागे पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. कुटुंबाचा प्रमुख आधारस्तंभ असलेल्या व्यक्तीवर अचानक ओढविलेल्या या संकटामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावकऱ्यांनी शासनाकडे तातडीची आर्थिक मदत, विशेष भरपाई आणि कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी मदतीची मागणी केली आहे.
-
शेतकऱ्याचे दोन्ही डोळे निकामी
गेल्या काही महिन्यांत या भागात वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याचे निदर्शनास येत आहे. दीड महिन्यापूर्वी दगडथर येथील शेतकरी उत्तम मारोती खराटे (वय ५५) यांच्यावरही अस्वलाने प्राणघातक हल्ला केला होता. या घटनेत शेतकऱ्याचे दोन्ही डोळे निकामी झाले असून अद्याप हा शेतकरी जीवन मरणाशी संघर्ष करीत आहे. या घटनेपाठोपाठ पुन्हा अस्वलाने हल्ला करून दुसऱ्या शेतकऱ्यास जबर जखमी केले आहे. अस्वलांचा व वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने ठोस मोहीम राबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com