पुणे : झेडपी पदाधिकारी होण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये चुरस

गजेंद्र बडे
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

- तरुणांची मागणी, 6 पदांसाठी 30 इच्छुक

- आजच्या बैठकीकडे लक्ष 

पुणे : जिल्हा परिषदेचा पदाधिकारी होण्यासाठी यंदा राष्ट्रवादी
कॉंग्रेसमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. येथील सहा जागांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 42 जिल्हा परिषद सदस्यांपैकी तब्बल 30 जण विविध पदांसाठी तीव्र इच्छुक आहेत. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीतील उमेदवारीप्रमाणे जिल्हा परिषदेत तरुणांना संधी द्यावी आणि यासाठी जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीत यंदा भाकरी फिरवावी, अशी मागणी राष्ट्रवादी
कॉंग्रेसच्या तरुण व अभ्यासू सदस्यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री यांनी उद्या (शनिवारी) या विषयावर बैठक आयोजित केली आहे. त्या बैठकीत ही मागणी करणार असल्याचे काही तरुण इच्छुक सदस्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. त्यामुळे अजित पवार उद्या काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले
आहे.

झेडपी पदाधिकारी होण्यासाठी सर्वच इच्छुकांनी आपापल्या परीने फिल्डिंग लावण्यास सुरवात केली आहे. यामध्ये विशेषतः अनेकांनी आपापल्या विधानसभा मतदारसंघातील आमदारांना पुढे केले आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील काही
इच्छुकांनी तर या मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनाच जिल्हा परिषदेच्या पदासाठी साकडे घातले आहे.

ज्येष्ठ कथाकार सखा कलाल यांचे निधन

पदाधिकारी होण्यासाठी इच्छुक असलेल्या जिल्हा परिषद सदस्यांचे पक्षांतर्गत तीन गटात आपोआपच वर्गीकरण झाले आहे. यापैकी पहिला गट हा तरुणांचा, दुसरा अभ्यासू व आतापर्यंत पदाधिकारी होण्याची संधी न मिळालेल्या सदस्यांचा तर, तिसरा गट हा याआधी पदाधिकारी झालेला परंतु
पुन्हा वरच्या पदासाठी इच्छुक असलेल्या सदस्यांचा तयार झाला आहे. यामुळे या तीन गटांपैकी नेमकी कोणाला संधी द्यावी, याबाबतचा पेच पक्षाचे नेते अजित पवार यांच्यापुढे यंदा निर्माण झाला आहे.

इच्छुकांच्या मागणीमुळे त्रस्त झालेल्या पवार यांनी शेवटी इच्छुकांकडून लेखी अर्ज घेण्याच्या सूचना जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना केली होती. या अर्जासोबत व्यक्तिगत माहिती (परिचयपत्र), पक्षासाठी केलेले काम आणि आपापल्या मतदारसंघात केलेल्या कामांचा लेखाजोखा सादर करण्याचे पवार यांनी सांगितले होते. त्यामुळे पक्ष आणि विकासकामांच्या आधारेच जिल्हा परिषदेतील पदे देण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, वशिल्यांपेक्षा पक्ष व मतदारसंघात सर्वाधिक विकासकामे केलेल्या आणि अभ्यासू सदस्यांनाच पदाधिकारी होण्याची संधी मिळावी. जेणेकरून जिल्हा परिषदेला तरुण, अभ्यासू व नवा चेहरा असलेले कारभारी मिळू शकतील, असा एक मतप्रवाह पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये असल्याचेही पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

कोणाला व्हायचंय झेडपी कारभारी

- विद्यमान दोन पदाधिकारी
- चार माजी पदाधिकारी
- अध्यक्षपदासाठी 15 सदस्या इच्छुक
- आतापर्यंत संधी न मिळालेले अभ्यासू सदस्य


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Become ZP Official Competitions in NCP