‘बेस्ट डीपी’साठी तरुणाईला फोटोशूटचे वेड!

सुवर्णा चव्हाण - @chavan_suvarna
बुधवार, 21 डिसेंबर 2016

पुणे - बाईकवर ‘स्टायलिश’ पोझ देऊन गौरवने फोटोशूट केले अन्‌ त्यातील ‘बेस्ट’ फोटो निवडून त्याने लगेच फेसबुकच्या डीपीवर टाकले...मग काय क्षणार्धात लाईक्‍सचा पाऊस अन्‌ कमेंट्‌सची बरसात झाली. ही आहे तरुणाईतील ‘डीपी फोटोशूट’ची नवी क्रेझ. प्रोफेशनल आणि हौशी छायाचित्रकारांकडून आवडत्या लोकेशन्सवर मस्त फोटोशूट करून त्यातील निवडक फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याचा नवा फंडा आल्यामुळे फोटोशूट करून देणाऱ्या तरुण छायाचित्रकारांनाही व्यवसायाची संधी मिळत आहे. 

पुण्यातील तळजाई आणि पर्वतीसह शनिवारवाडा, खडकवासला, सिंहगड, पानशेत, मुळशी, लवासा अशा विविध लोकेशन्सवर असे फोटोशूट करून देणारे प्रोफेशनल आणि हौशी तरुण छायाचित्रकार दिसून येत आहेत. फावल्या वेळेत कमाई व्हावी, या उद्देशाने हे छायाचित्रकार तरुण-तरुणींना ऑन लोकेशन फोटोशूट करून देतात. 

वेगवेगळ्या स्टाइल आणि थीमनुसार फोटोशूट करून ते ‘ऑन द स्पॉट’ तरुण-तरुणींना फोटो देतात. हौशी छायाचित्रकार पाच फोटोंसाठी शंभर रुपये, तर प्रोफेशनल छायाचित्रकार पाच फोटोंसाठी पाचशे रुपये घेतात. पण आपला फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्‌सॲप आणि हाईकवरचा ‘डीपी’ सगळ्यात स्टायलिश आणि कुल दिसावा यासाठी तरुण-तरुणी असे फोटोशूट करून घेत आहेत. त्यामुळे छायाचित्रकारांची फोटोशूटसाठी दर महिन्याला सात ते आठ हजार रुपयांची कमाई होत असून, हा एक ‘पार्ट टाइम’ व्यवसायच बनत आहे. 

अक्षय गलांडे हा दोन वर्षांपासून असे फोटोशूट करून देत आहे. तो म्हणाला,‘‘स्टाइल आणि लाईक्‍ससाठी हे फोटोशूट केले जाते. त्यानुसार आम्ही फोटोशूट करून देतो. अशी फोटोग्राफी करणारे पुण्यात अंदाजे तीन ते चार हजार छायाचित्रकार असतील. जे वेगवेगळ्या लोकेशन्सवर फोटोशूट करतात. वीकेंडला तर असे फोटोशूट करणाऱ्यांची कमतरता नसते. फोटोशूटनंतर लगेचच फोटो फेसबुकवर अपलोड केले जातात. या क्रेझमुळे छायाचित्रकारांसाठी एका नव्या व्यवसायाचा पर्याय निर्माण झाला आहे.’’
नितीन बनसोडे हाही फोटोशूट करतो. तो या क्षेत्रात नवा असला तरी त्याच्याकडे येणाऱ्या तरुणांची संख्याही कमी नाही. नितीन म्हणाला, ‘‘लाईक्‍ससाठी फोटोसूट करणारी तरुणांची संख्या वाढत आहे. नव्या लोकेशन्सवर त्यांच्या मागणीप्रमाणे फोटोशूट करावा लागतो. स्टाइल आणि लुक मिळावा हा त्यामागचा उद्देश असतो. कित्येकजण दर तीन महिन्यांनी फोटोशूट करून घेतात.’’

मी स्वतः मागच्या महिन्यात असा फोटोशूट करून घेतला. त्यातला बेस्ट डीपी मी फेसबुकवर अपलोड केला आणि मला पाचशे लाईक्‍स मिळाल्या. या फोटोशूटमुळे आपल्याला आवडतील असे डीपी मिळतात. माझे मित्र-मैत्रिणीही तीन महिन्यांतून एकदा असे फोटोशूट करून घेतात. 
- पंकज जाधव

Web Title: best dp photoshoot