esakal | सावध व्हा! परदेशात नोकरीच्या आमिषाने होतेय ऑनलाईन फसवणूक; पारनेरमधून एकास अटक
sakal

बोलून बातमी शोधा

सावध व्हा! परदेशात नोकरीच्या आमिषाने होतेय ऑनलाईन फसवणूक; पारनेरमधून एकास अटक

सावध व्हा! परदेशात नोकरीच्या आमिषाने होतेय ऑनलाईन फसवणूक; पारनेरमधून एकास अटक

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

पुणे : परदेशात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणांची ऑनलाईन माध्यमाद्वारे फसवणूक करणाऱ्या टोळीचा सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी नगर जिल्ह्यातील पारनेरमधून एकास अटक केली आहे. याबरोबरच टोळीच्या सुत्रधाराचाही पोलिसांनी शोध घेतला आहे. अटक केलेल्या आरोपीस न्यायालयाने 18 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. विशाल मिनानाथ जमदाडे (वय.24, रा. पारनेर, नगर) असे अटक केलेल्याचे संशयित आरोपीचे नाव आहे. तर अनुप ढोरमले (रा. जातेगाव,ता. पारनेर) हा त्याचा साथीदार असून तो सध्या गुजारतमधील बडोदा कारागृहात आहे. ढोरमले हाच टोळीचा मुख्य सुत्रधार असून त्याच्याविरुद्ध गुजरात व महाराष्ट्र या दोन्ही राज्यात फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत.

शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात 2020 मध्ये नोकरीच्या आमिषाने 4 लाख 60 हजारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सायबर पोलिसांकडुन सुरू होता. तांत्रिका माहितीच्या आधारावर संबंधीत गुन्हा हा पारनेर तालुक्‍यातील दोघांनी केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी पारनेर येथे सापळा रचून जमदाडे यास ताब्यात घेतले. तरुणांची फसवणूक करुन घेतलेले पैसे जमदाडेच्या बॅंक खात्यावर जमा होत होते. हे पैसे जमदाडे ढोरमलेला देत होता. दरम्यान, त्यांच्या टोळीतील अन्य साथीदारांचाही पोलिसांकडून शोध सुरू आहे. आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मच्छिंद्र पंडीत, अंकुश चिंतामन, कर्मचारी संदेश कर्णे, अस्लम अत्तार, मंगेश नेवसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा: पुणे : २४ तासात कोरोनाने घेतले शंभराहून अधिक बळी

अशी होती गुन्हे करण्याची पद्धती

नोकरीची गरज असणाऱ्या तरुणांकडून विविध संकेतस्थळांवर नोकरीसाठी अर्ज केले जातात. अशा संकेतस्थळावरुन तरुणांची माहिती आरोपी मिळवित होते. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना विदेशात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवित होते. तसेच संबंधित तरुणांचा विश्‍वास संपादन करण्यासाठी त्यांना परदेशातील कंपन्यांचा ईमेल पाठवित होते. तरुणांकडून प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी, व्हिसा, मुलाखत, प्रवास व निवास खर्च अशी वेगवेगळी कारणे सांगून त्यांची फसवणूक करीत होते.

loading image