भक्ती-शक्ती चौक वर्षात सिग्नल फ्री

ज्ञानेश्‍वर बिजले
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

पिंपरी - निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात एकाच वेळी सुरू असलेले ग्रेड सेपरेटर आणि उड्डाण पुलाचे काम सुमारे ४० टक्के पूर्ण झाले असून, पुढील वर्षाच्या अखेरीला प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा चौक ‘सिग्नल फ्री’ होईल. चहूबाजूंनी येणारी वाहने वेगाने मार्गस्थ होत पादचाऱ्यांसाठीही जागा उपलब्ध होणार आहे. 

पिंपरी - निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात एकाच वेळी सुरू असलेले ग्रेड सेपरेटर आणि उड्डाण पुलाचे काम सुमारे ४० टक्के पूर्ण झाले असून, पुढील वर्षाच्या अखेरीला प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा चौक ‘सिग्नल फ्री’ होईल. चहूबाजूंनी येणारी वाहने वेगाने मार्गस्थ होत पादचाऱ्यांसाठीही जागा उपलब्ध होणार आहे. 

बीआरटी बससेवा लवकरच सुरू होत असून, त्याचेही स्थानक या चौकात आहे. मेट्रोही या चौकापर्यंत वाढविण्याचा आराखडा पंधरवड्यात सादर होईल. या सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करताना रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा न आणता पादचाऱ्यांनाही सुरक्षितपणे मार्ग ओलांडता येईल, या उद्देशाने हा तीन टप्प्यांचा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने गतवर्षी घेतला आणि कामाला प्रारंभ केला. त्यासाठी ९० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

जुना मुंबई-पुणे रस्ता आणि प्राधिकरणाचा स्पाइन रस्ता या चौकात एकत्र येतो.

वेगवान वाहतुकीमुळे या परिसरात अनेक अपघात झाले आहेत. देहूरोड-कात्रज महामार्गाचे रुंदीकरण, रावेत येथील पुलाचे काम सुरू असल्याने नाशिक महामार्गावरून कात्रज-देहूरोड रस्त्याकडे जाणारी वाहने या चौकातून मार्गस्थ होतील. येथील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यापूर्वीच हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन महापालिकेने आखले.

पुणे-मुंबई रस्त्यावरील वाहनांसाठी ८४९ मीटर लांबीचे दोन उड्डाण पूल बांधण्यात येत आहेत. दोन्ही बाजूला जाण्यासाठी प्रत्येकी तीन लेन असतील. पुलाच्या १७ खांबांपैकी १६ बांधून पूर्ण झाले. आठ खांबांवर ‘कॅप’ बसविल्या. प्राधिकरणाच्या बाजूला ग्रेडसेपरेटरचे काम ५५ टक्के पूर्ण झाले आहे.

भक्‍ती-शक्ती हा वाहनांच्या गर्दीचा सर्वांत मोठा चौक सिग्नल फ्री होईल. डिसेंबर २०१९ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्यात येईल. थेट वाहतूक व पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र सुविधांमुळे या तीन टप्प्यांच्या प्रकल्पात सर्व बाजूंनी वाहतूक एकाच वेळी सुरू राहणार आहे.
- विजय भोजने, उपअभियंता, महापालिका

 ग्रेड सेपरेटरमुळे प्राधिकरण ते मोशी जोडणार
 लांबी ४२० मीटर, रुंदी २४ मीटर, उंची ५.५ मीटर
 ग्रेड सेपरेटरमध्ये प्रत्येकी दोन लेन
 पुणे-मुंबई रस्त्यावरील उड्डाण पुलामुळे थेट वाहतूक 
 प्राधिकरणाकडून पुणे व मुंबईकडे जाण्यासाठी स्वतंत्र पूल
 उड्डाण पुलाखालून बीआरटी बससेवा
 वर्तुळाकार रस्ता
 वाहतूक बेटाचा व्यास ६० मीटर

Web Title: bhakti-shakti chowk signal free overbridge