पुणेकरांचे लक्ष लागलेल्या भामा आसखेडमधून विसर्ग

रुपेश बुट्टे
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

पुणेकरांचे लक्ष लागलेले खेड तालुक्‍यातील भामा आसखेड धरण जवळपास शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून सध्या 3246 क्‍युसेकने विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे

आंबेठाण (पुणे) : पुणेकरांचे लक्ष लागलेले खेड तालुक्‍यातील भामा आसखेड धरण जवळपास शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून सध्या 3246 क्‍युसेकने विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे, अशी माहिती भामा आसखेड सिंचन व्यवस्थापन विभागाचे शाखा अभियंता भारत बेंद्रे यांनी दिली आहे. 

भामा आसखेड धरणाच्या चारही दरवाजातून शुक्रवारी (ता. 2) रात्री आठ वाजल्यापासून 2118 क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले होते. पावसाची संततधार लक्षात घेता आज (ता. 3) सायंकाळी चार वाजल्यापासून विसर्ग वाढविण्यात आला आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता 8.14 टीएमसी इतकी आहे. या धरणातून पुणे शहरासही पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे पुणेकरांचे या धरणाच्या साठ्याकडे लक्ष लागले होते. 

खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात मागील आठ ते दहा दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. सध्या भामा आसखेड धरणात 99.29 टक्के पाणीसाठा झाला आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून खबरदारीचा उपाय म्हणून धरणाच्या चारही दरवाजातून 2118 क्‍युसेकने विसर्ग सुरू ठेवण्यात आला होता. त्यासाठी चारही दरवाजे 20 सेंटिमीटरने उचलण्यात आले होते; परंतु त्यात वाढ करून आज सायंकाळी चार वाजल्यापासून धरणातून 3246 क्‍युसेकने विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यासाठी धरणाचे चारही दरवाजे 30 सेंटिमीटरपर्यंत उचलण्यात आले आहे. धरणातून पाणी सोडल्यामुळे भामा नदी दुथडी भरून वाहत आहे. 

नदीकाठच्या गावांनी सावधानता बाळगावी 
धरण परिसरात आजपर्यंत 1026 मि.मी. पाऊस झाला आहे; तर आज सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत 9 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. अजूनही धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असून, पाऊस असाच सुरू राहिला; तर विसर्ग वाढवावा लागेल. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन भामा आसखेड धरण प्रशासनाच्या वतीने भारत बेंद्रे व के. डी. पांडे यांनी केले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhama aaskhed dam filled