Water
Water

भामा आसखेड प्रकल्पाला गती

पुणे - शहराच्या पूर्व भागातील रहिवाशांना पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या भामा आसखेड प्रकल्पाचे काम येत्या ऑक्‍टोबरमध्ये पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या भागातील लोकांना येत्या नोव्हेंबर महिन्यापासून या प्रकल्पातून पाणी मिळेल. प्रकल्पाच्या कामासोबतच, सिंचन निधी आणि शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने महापालिकेच्या स्थायी समितीने सुमारे १८५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या कामातील अडथळे दूर झाले आहेत. 

पूर्व भाग म्हणजे, खराडी, चंदननगर, विश्रांतवाडी, धानोरी, कळससह परिसरांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यानुसार २०१४ मध्येच तो पूर्ण होऊन पाणीपुरवठा होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागणी आणि त्यावरून निर्माण झालेली राजकीय परिस्थिती, यामुळे प्रकल्पाच्या कामात अडथळे आले. राज्य सरकार, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे काणाडोळा केला. परिणामी, आंदोलनाचा पवित्रा घेत, शेतकऱ्यांनी अनेकदा काम रोखले. 

‘‘प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यातील काम सुरू असले तरी, मागण्या मान्य होईपर्यंत पाणी सोडू देणार नाही, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. त्यातच, शहरातील पाणीटंचाई लक्षात घेता, महापालिकेच्या अर्थसंकल्पात १८५ कोटींची तरतूद करीत, प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे. या निधीतून शेतकऱ्यांच्या मागण्याही मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे,’’ असे स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या मागण्या कळीच्या ठरणार 
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत तोडगा काढण्याचा निर्णय झाला, तरी त्यातून राज्य सरकार ठोस निर्णय घेत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच हा प्रकल्प रखडला होता. मात्र पिंपरी-चिंचवड महापालिकेपाठोपाठ पुणे महापालिकेनेही पुढाकार घेतल्याने हा प्रकल्प लवकर मार्गी लागेल, अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे, सध्या प्रकल्पाचे काम सुरू असले, तरी त्यातील काही महत्त्वाचे काम पुन्हा रोखून धरण्याचा शेतकऱ्यांचा पवित्रा आहे. त्यामुळे स्थायीने निधी दिला, तरी शेतकऱ्यांच्या मागण्यांवरील प्रत्यक्ष कार्यवाही कळीचा मुद्दा ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com