पुण्यातील येरवडा, विश्रांतवाडी, वडगावशेरी, धानोरी भागात मिळणार पुरेसे पाणी कारण..

ज्ञानेश सावंत
Monday, 30 November 2020

भामा आसखेड प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, पुढील काही दिवस तांत्रिक अडचणी येऊ शकतात. तांत्रिक तपासण्या करूनच पाणी पुरविण्याचे नियोजन पुणे महापालिकेने केले आहे. त्यामुळे पुढील टप्प्यात पाणीपुरवठा विस्कळित होणार नाही, असे अधीक्षक अभियंता आणि प्रकल्पाचे प्रमुख युवराज देशमुख यांनी स्पष्ट केले. चाचण्यांनंतर रहिवाशांना पाणी मिळेल, असे आमदार सुनील टिंगरे यांनी सांगितले.

पुणे : शहराच्या पूर्व भागातील येरवडा, विश्रांतवाडी, वडगावशेरी, धानोरीतील 10 लाख लोकसंख्येला आता रोज पुरेसे पाणी मिळणार आहे. या भागाच्या पाणीपुरवठ्यासाठी आखलेल्या भामा आसखेड प्रकल्पाचे काम अखेर संपले असून, या प्रकल्पातून रहिवाशांना पुढील 15 दिवसानंतर सुरळीत पाणीपुरवठा होईल. त्यासाठी भामा आसखेड धरणापासूनची जलवाहिनी, पाण्याच्या टाक्‍या, जल शुद्धीकरण केंद्रातून शुद्ध पाणीपुरवठ्याची चाचणी सोमवारपासून (ता. 30) होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

भामा आसखेड प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, पुढील काही दिवस तांत्रिक अडचणी येऊ शकतात. तांत्रिक तपासण्या करूनच पाणी पुरविण्याचे नियोजन पुणे महापालिकेने केले आहे. त्यामुळे पुढील टप्प्यात पाणीपुरवठा विस्कळित होणार नाही, असे अधीक्षक अभियंता आणि प्रकल्पाचे प्रमुख युवराज देशमुख यांनी स्पष्ट केले. चाचण्यांनंतर रहिवाशांना पाणी मिळेल, असे आमदार सुनील टिंगरे यांनी सांगितले.

नगर रस्त्यावरील लोकवस्त्यांमधील पाणी टंचाई संपून त्यांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी 2013 मध्ये तेव्हाचे पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी भामा आसखेड धरणातून पाणी घेण्याच्या योजनेला मंजुरी दिली. त्यानंतर राजकीय अडथळ्यांनंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या परवानगीनंतर योजनेचे काम हाती घेण्यात आले. मात्र, धरणातून जमीन गेलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या आणि त्यावरून झालेल्या आंदोलनामुळे योजनेच्या कामांत अडथळे आले. हे काम रखडले आणि त्यामुळे पूर्व भागाला पाणी मिळू शकले नाही. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पोलिस बंदोबस्तात योजनेतील महत्त्वाची कामे करण्यात आली आहेत. परिणामी, नियोजित भागांना पाणी मिळणार आहे.

आईच निघाली सव्वा महिन्याच्या मुलीची मारेकरी

प्रकल्पग्रस्तांना 105 कोटी
जमिनीचा मोबदला मागत, प्रकल्पाचे काम रोखून धरलेल्या भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी पुणे महापालिकेने 105 कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे दिले आहेत. त्यानुसार प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्यात येत असल्याचे महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुदेश कडू यांनी सांगितले. पुर्नसिंचनाच्या खर्चाऐवजी थेट शेतकऱ्यांना मदत करण्याचा आदेश तत्कालीन राज्य सरकारने महापालिकेला दिला होता. त्यानंतर काही दिवसांतच 105 कोटी रुपये देण्यात आले.

''पुणे शहराची वाढलेली लोकसंख्या, प्रत्यक्ष पाण्याची मागणी आणि त्याच्या कमतरतेचा विचार करता भामा आसखेड धरणातून रोज 150 एमएलडी पाणी घेता येईल. त्यामुळे पुण्याच्या पूर्व भागातील रहिवाशांना पुरेसे पाणी मिळेल. मात्र, प्रकल्पाचे काम झाले तरी, सर्व चाचण्या करूनच शुद्ध पाणीपुरवठा केला जाईल.''
- प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, पुणे महापालिका

"मी इथला भाई आहे' अशी धमकी देत मागितली खंडणी  

403 कोटी : प्रकल्पाचा एकूण खर्च

418 कोटी निविदा मंजूर

360 कोटी आतापर्यंतचा खर्च

कोणाकडून किती खर्च ?
केंद्र सरकार ः 50 टक्के
राज्य सरकार ः 20 टक्के
पुणे महापालिका ः 30 टक्के

5 जुलै 2013 -प्रकल्प मंजूर

जानेवारी 2014 - प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम
2.6 अब्ज घनफूट (टीएमसी)
धरणातून मिळणारे पाणी (वर्षाकाठी)

फोटो : 29557


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhama Askhed project completed Now Sufficient water for the eastern part of Pune