भांबुर्डा वनक्षेत्रामध्ये २१ हजार रोपे लावणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

पुणे - पावसाळ्यात शिवाजीनगर मतदारसंघातील भांबुर्डा वनक्षेत्रात २१ हजार १०० रोपांची लागवड करण्यात येणार आहे. तसेच लोकसहभागातून वृक्ष दत्तक योजनादेखील राबविण्यात येणार आहे.

पुणे - पावसाळ्यात शिवाजीनगर मतदारसंघातील भांबुर्डा वनक्षेत्रात २१ हजार १०० रोपांची लागवड करण्यात येणार आहे. तसेच लोकसहभागातून वृक्ष दत्तक योजनादेखील राबविण्यात येणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वन विभाग व सामाजिक वनीकरण विभाग इतर शासकीय विभाग तसेच शाळा, संस्था आणि स्वयंसेवी घटकांचे सहकार्य घेणार आहे. भांबुर्डा वन परिक्षेत्रासाठी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून स्मृतिवन, गणेशवन, जैवविविधता रोपवन, गुलाब वाटिका, गोंद वन, सुगंधी वनस्पती, नवग्रह वन, पंचवटी वन, अशोक वन अशा विविध प्रकारची वने विकसित करण्यात येत आहेत. तसेच या क्षेत्रात प्राण्यांच्या प्रतिकृती उभारण्यात येणार असून, लहान मुलांसाठी आकर्षक बालोद्यानाची निर्मितीदेखील करण्यात येणार असल्याची माहिती आमदार विजय काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

उपवनसंरक्षक ए. श्रीलक्ष्मी म्हणाल्या, ‘‘रोपांच्या संगोपनासाठी रोपे दत्तक देण्याची संकल्पना मांडली आहे. पुढील वर्षी या झाडांच्या संगोपनाचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. त्याच वेळी सर्वोत्कृष्ट जोपासलेल्या झाडांच्या पालकांना प्रोत्साहनपर बक्षिसे दिली जातील.’’

१६० हेक्‍टरवरील अतिक्रमणे हटवली 
वन विभागाच्या १६० हेक्‍टरवरील अतिक्रमणे हटविण्यात यश असल्याची माहिती या वेळी पुणे विभागाच्या उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी यांनी दिली. वन विभागाच्या जागेवरील अतिक्रमण आढळल्यास तातडीने त्याबाबत नोटिसा बजाविण्यात येणार असून, लगेच कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: bhamburda forest tree plantation