भिडेवाड्यात सावित्रीबाईंचे स्मृतिस्थळ - गिरीश बापट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

नागपूर - देशातील पहिली मुलींची शाळा जिथे सुरू झाली, त्या भिडेवाड्यात सावित्रीबाई फुले यांच्या नावाने भव्य स्मृतिस्थळ उभारणार आहे, अशी माहिती संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.

नागपूर - देशातील पहिली मुलींची शाळा जिथे सुरू झाली, त्या भिडेवाड्यात सावित्रीबाई फुले यांच्या नावाने भव्य स्मृतिस्थळ उभारणार आहे, अशी माहिती संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.

सावित्रीबाई फुले यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या या ऊर्जास्थळाचे काम प्राधान्याने पूर्ण करावे, असे आदेशही त्यांनी पुणे महापालिकेला दिले आहेत. तसेच, शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागालाही हे काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे बापट यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेत आज या संदर्भात तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता, त्यावर ते बोलत होते.

सावित्रीबाईंचे स्मारक उभारावे, अशी मागणी अनेक संस्था- संघटनांनी केली होती. त्याची दखल घेऊन भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करण्याच्या हालचाली शासकीय स्तरावर सुरू झाल्या आहेत. पुणे महापालिकेनेही त्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद केली असून, या जागेच्या भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू झाली आहे.

मुळा-मुठाचे शुद्धीकरण
पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा व मुठा या नद्यांच्या शुद्धीकरणासाठी राष्ट्रीय नदीसंवर्धन योजनेतून 990 कोटी रुपये मंजूर केल्याचे बापट यांनी सांगितले. विधान परिषदेत हाही विषय आज पटलावर आला होता. हद्दीबाहेरील नदीकाठच्या गावांतून, तसेच पुणे महापालिका हद्दीतून मुळा व मुठा नदीत काही प्रमाणात सांडपाणी सोडले जाते. त्याची दखल शासनाने घेतली आहे. नदीसंवर्धन योजनेतून पुणे शहरातील 396 दशलक्ष लिटर सांडपाणी प्रक्रिया करून नदीत सोडणार आहे. या प्रकल्पाचे काम 2022 मध्ये पूर्ण होईल, असे ते म्हणाले.

सायकल पार्किंगसाठी 798 जागा
पुण्यातील सायकल शेअरिंग योजनेचा मुद्दाही विधान परिषदेत आज उपस्थित झाला. एकात्मिक सायकल आराखड्यानुसार ही योजना कार्यान्वित झाली आहे. हा संपूर्ण आराखडा दोन वर्षांत पूर्ण होईल. सायकल पार्किंगसाठी 798 जागा निश्‍चित केल्या आहेत. त्यापैकी 152 दाट वस्तीत आहेत, अशी माहिती सरकारतर्फे देण्यात आली.

Web Title: Bhidewada Savitribai Phule memory place Girish bapat