'भाटघर'च्या 2 दरवाजांतून नीरा नदीत विसर्ग सुरू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 डिसेंबर 2017

भोर - जलसंपदा विभागामार्फत शनिवारी (ता. 16) सायंकाळपासून भाटघर धरणाच्या दोन दरवाजांमधून 1 हजार 90 क्‍युसेक पाणी नीरा नदीत सोडण्यास सुरवात करण्यात आली. तालुक्‍यातील नीरा देवघर धरणातूनही सोमवारपासून (ता. 11) 700 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

भोर - जलसंपदा विभागामार्फत शनिवारी (ता. 16) सायंकाळपासून भाटघर धरणाच्या दोन दरवाजांमधून 1 हजार 90 क्‍युसेक पाणी नीरा नदीत सोडण्यास सुरवात करण्यात आली. तालुक्‍यातील नीरा देवघर धरणातूनही सोमवारपासून (ता. 11) 700 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

तालुक्‍यातील 24 टीएमसी पाणीक्षमता असलेल्या भाटघर धरणात 97 टक्के साठा आहे, तर 12 टीएमसी क्षमता असलेल्या नीरा देवघर धरणात 94 टक्के साठा आहे. दोन्ही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पूर्वेकडील वीर धरणात दररोज 1 हजार 790 पाणीसाठ्याची भर पडत आहे. वीर धरणाच्या डाव्या कालव्यातून 450 क्‍युसेक, तर उजव्या कालव्यातून 1 हजार 500 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वीर धरणात सध्या 54.93 टक्के पाणीसाठा आहे.

या वर्षी पाऊस उशिरा झाल्याने धरणात दरवर्षीपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. नीरा देवघर धरणावरील वीजनिर्मिती केंद्रातून 700 क्‍युसेक सुरू असलेला पाण्याचा विसर्ग बंद होण्याची शक्‍यता धूसर आहे; परंतु "भाटघर'मधील पाणीसाठा कमी झाल्यानंतर धरणातून होणारा विसर्ग थांबविण्यात येण्याची शक्‍यता आहे. भाटघर धरणावरील वीजनिर्मिती केंद्र बंद असल्याने धरणाच्या दोन दरवाजांमधून पाणी सोडण्यात येत आहे.

पर्यटकांची गर्दी
भाटघर धरणाच्या दरवाजांमधून पडणाऱ्या पाण्याचे सौंदर्य टिपण्यासाठी आणि खळखळणाऱ्या पाण्याच्या आवाजाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी धरणाच्या भिंतीच्या खालच्या बाजूला गर्दी केली. सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने पर्यटकांशिवाय रस्त्यावरून जाणारे प्रवासी मोटारी, गाड्या थांबवून धरणातून फेसाळत पडणाऱ्या पाण्याचे दृश्‍य पाहत असलेले आढळून आले. अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये शूटिंग केले, फोटो व सेल्फीही काढले.

Web Title: bhor pune news water release in bhatghar dam