भोर शिक्षक संघाकडून विद्यार्थ्यांना सायकली

निवंगण (ता. भोर) - भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघातर्फे विद्यार्थ्यांना मोफत सायकली देण्यात आल्या.
निवंगण (ता. भोर) - भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघातर्फे विद्यार्थ्यांना मोफत सायकली देण्यात आल्या.

भोर - तालुक्‍यातील शिक्षकांच्या रिक्त जागांमुळे दुर्गम भागात असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शिक्षक मिळत नाही. यासाठी भोर तालुका शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी काही महिने दुर्गम भागात जाऊन ज्ञानदानाचे कार्य केले. तसेच शिक्षकांनी तेथील विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीबरोबर शैक्षणिक साहित्यही दिले. तसेच १५ विद्यार्थ्यांना मोफत सायकली भेट दिल्या. 

भोर तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष सुदाम ओंबळे, सरचिटणीस विजय थोपटे, माजी सरचिणीस पंडीत गोळे, शिक्षक पतसंस्थेचे अनंता आंबवले, जयवंत घाडगे, प्रकाश पाटणे, महेंद्र शिंदे व बबन सातव या शिक्षकांनी पहिल्या टप्यात आणि राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले शिक्षक भीराव शिंदे यांच्यासह सुरेश कंक, गणेश बोरसे, सचिन साकोळकर व उमेश दामगुडे यांनी दुसऱ्या टप्प्यात दुर्गम भागातील शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात बदल्या स्वीकारल्या. भोरपासून किंवा आपल्या नैमित्तिक नेमणुकीस असलेल्या शाळेपासून सुमारे ५२ किलोमीटरपर्यंत दूर असलेल्या शाळांमध्ये जाऊन ज्ञानदानाचे काम केले.

शिक्षक संघाचे अध्यक्ष सुमाद ओंबळे व आदर्श शिक्षक भीमराव शिंदे यांनी विद्यार्थ्यांना सायकली देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पुण्यातील सिपिल फाउंडेशनने शिक्षक संघाची विनंती मान्य करून त्यांना १५ सायकलींसाठी सहकार्य करण्यास तयारी दर्शवली. सिपिल फाउंडेशनच्या वतीने शिक्षक संघाने तालुक्‍याच्या हिर्डोशी खोऱ्यातील (नीरा-देवघर धरण खोऱ्यातील) निवंगण येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील १५ विद्यार्थ्यांना या सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले. या वेळी सुदाम ओंबळे, भीमराव शिंदे, पंडित गोळे, प्रशांत बनकर, रामदास कानडे, बापू गवारी आदी उपस्थित होते.

दुर्गम भागात अध्यापन
ऑनलाइन बदल्यांमध्ये शिक्षकांनी सुगम ठिकाणच्या शाळा निवडल्या. यासाठी आणि दुर्गम भागातील शाळा शिक्षकाविना राहिल्या. त्यामुळे प्रशासनाने शेजारच्या गावातील शिक्षकांच्या बदल्या तात्पुरत्या स्वरूपात दुर्गम भागातील शाळांमध्ये केल्या; परंतु त्यामध्येही नैमित्तिक अडचणी निर्माण झाल्या. विद्यार्थी व पालकांची नाराजी वाढत गेली. त्यामुळे गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन संघाच्या शिक्षक सदस्यांना प्रशासनाला मदत करण्याची विनंती केली. त्यानुसार शिक्षक संघाच्या तालुक्‍यातील पदाधिकाऱ्यांनी तात्पुरत्या स्वरूपात दुर्गम भागातील शाळांमध्ये जाऊन शिकविण्याचा निर्णय घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com