भोसरीचे वैभव वाढविणारे सहल केंद्र

संजय बेंडे
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

नागरिकांना स्वच्छ हवा पुरविण्याचे काम पिंपरी-चिंचवड शहरात उभारलेली उद्याने करीत आहेत. भोसरी व इंद्रायणीनगर परिसरात छोटी-मोठी पंधरा उद्याने आहेत. त्यामुळे भोसरी परिसर हा उद्यानाचा परिसर म्हटले तर वावगे ठरणार नाही. भोसरीत सव्वीस एकर जागेत आकर्षक सहल केंद्र उभारले आहे. मुलांसाठी झुकझुकगाडी आणि मोठ्यांसाठी आकर्षक लॅंडस्केपिंगमुळे हे उद्यान आबालवृद्धांचे आवडीचे ठिकाण बनले आहे. या उद्यानाविषयी...

भोसरी व इंद्रायणीनगर परिसरात असलेली पंधरा छोटी-मोठी उद्याने भोसरीचे सौंदर्य वाढवत आहेत. आळंदी रस्त्यावर सखूबाई गवळी उद्यान, दिघी रस्त्यावर गंगोत्री पार्क, इंद्रायणीनगरातील नाना-नानी पार्क, मिनी मार्केटजवळील उद्यान, संत तुकारामनगरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, नेहरूनगरातील गुलाबपुष्प उद्यान आदी उद्यानांबरोबरच इतरही उद्याने भोसरीचे वैभव वाढवत आहेत. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारी सर्व्हे क्रमांक एकमधील आरक्षण क्रमांक ४३३ वर महापालिकेने सुमारे सव्वीस एकर जागेत भव्य उद्यान आहे. हे उद्यान भोसरीतील मध्यवर्ती ठिकाणी आहे. उद्यानाशेजारीच जलतरण तलावही आहे. पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

आकर्षक लॅंडस्केपिंग, प्रशस्त तळे
उद्यानात प्रवेश केल्यावर बगळ्यांची प्रतिकृती असलेल्या आकर्षक मूर्तींनी स्वागत होते. या उद्यानात आकर्षक लॅंडस्केपिंग असल्यामुळे धरतीने हिरवेगार गालिचे पांघरल्याचा अनुभव मिळतो. प्रशस्त अशा हिरवळीवर पर्यटकांना बसण्याचा मोह आवरता येत नाही. उन्हाळ्यातही गारवा देणाऱ्या आल्हादकारक हिरवळीने पर्यटक भुलून गेलेला असतो. उद्यानाची तेरा एकर जागा तळ्याने व्यापली आहे. तळ्यात मोठ्या प्रमाणात मासे असलेले दिसून येते. या माशांना अन्न देण्याचा आनंदही पर्यटकांना मिळतो. या तळ्याच्या मधोमध ध्यानकेंद्र आहे. पूर्वी हे ध्यानकेंद्र सुरू होते. मात्र गेल्या तीन वर्षापासून नागरिकांना हे ध्यानकेंद्र बंद केले आहे. हे ध्यानकेंद्र योग्य त्याच्या सुरक्षिततेच्या खबरदारीसह पुन्हा सुरू करण्याची मागणी आहे. 

भुलभुलय्या व राणीचा किल्ला
लहान मुलांना लपाछपी खेळण्यासाठी तसेच एकमेकांना शोधण्याचा आनंद घेण्यासाठी भुलभुलय्या बांधण्यात आले आहे. त्याचप्रमाणे येथे राणीचा किल्लाही उभारण्यात आला आहे. या किल्ल्याची सैर करण्याचा आनंद लहानांसह मोठेही घेताना दिसतात. किल्ल्यामध्ये खेळणीही बसविण्यात आलेली आहेत.

झुकझुकगाडी
सहल केंद्राचे मुख्य आकर्षण म्हणजे बालगोपाळांसाठी असलेली झुकझुकगाडी. या झुकझुकगाडीचा ट्रॅक सुमारे सातशे मीटर लांबीचा असल्याने झुकझुकगाडीची मोठी सफर लहानग्यांना होते. या झुकझुकगाडीमुळे या सहल केंद्रात येणाऱ्या लहानग्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

जॉगिंग ट्रॅक अन्‌ पक्षीही
सहल केंद्रामध्ये सातशे मीटर लांबीचा जॉगिंग ट्रॅक आहे. दररोज पहाटे भोसरीकर या सहल केंद्रात जॉगिंगसाठी येतात. सकाळी उद्यानात फिरण्याबरोबरच आकर्षक हिरवळीचा आनंदही घेतात. त्याचप्रमाणे मधुर पक्ष्यांच्या आवाजानेही ताजेतवाने होतात.उद्यानात चिमणी-कावळ्यांसह बुलबुल, पोपट, कोकिळा, धीवर, मैना, काकाकुआ आदींसह विविध पक्षी असलेले आढळतात. त्यामुळे पक्षीप्रेमींना हे उद्यान वरदानच ठरत आहे. या उद्यानाच्या तळ्यात चार बदके आणि दोन राजहंस विहारत असताना पाहून पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडतात. त्याचप्रमाणे या तळ्यातील माशांवर ताव मारण्यासाठी बगळ्यांबरोरबरच काही परदेशी पाहुणेही (पक्षी) आलेले पर्यटक सांगतात.

विविध खेळणी व पर्यटकांची गर्दी
उद्यानात पंधरा प्रकारची विविध आकर्षक खेळणी बसविलेली आहेत. मल्टिपरपोज खेळणी ही लहानग्यांची आवडती खेळणी आहेत. त्याचप्रमाणे झोका तर आबालवृद्धांचे आवडीचे खेळणे झाले आहे. पक्ष्यांच्या किलबिलाटासह खेळण्यात दंग असलेल्या लहानग्यांचा किलकिलाट वातावरणात गोडवा निर्माण करतो. उद्यानात दररोज सुमारे तीनशे ते साडेतीनशे पर्यटक भेट देतात. रविवार आणि गुरुवारी सुटीच्या दिवशी ही संख्या हजारापर्यंत जाते. राष्ट्रीय सणांच्या दिवशी ही संख्या तीन ते पाच हजारापर्यंत पोचलेली असते. त्यामुळे या सहल केंद्रापासून महानगरपालिकेला उत्पन्नही चांगले मिळत आहे. सहल केंद्रात सुरूची, बॉटल पाम, सायकस, अकिलफा, चाफा आदींसह विविध प्रकारच्या झाडांची संपदा असलेली दिसून येते. गर्द झाडींनी नटलेले हे सहलकेंद्र भर उन्हाळ्यातही सावलीसह पर्यटकांना गारवा देते. झाडांच्या गर्दीमुळे पक्षी व छोटे-मोठे प्राणीही गुण्यागोविंदाने येथे वास्तव्य करताना दिसतात.

देखभालीची गरज
सर्वांगसुंदर निसर्गाने नटलेल्या या उद्यानाच्या सुरक्षिततेची जबाबदारी पालिकेने येथे सुरक्षारक्षकांत वाढ करून केली पाहिजे. त्याचप्रमाणे स्वच्छतागृहांस इतर सुविधाही चांगल्या प्रकारे पुरविणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे प्रेमीयुगुलांद्वारे झाडांवर नावे कोरली जातात. त्यामुळे झाडांचे विद्रुपीकरण होत आहे. त्यांच्यावर आळा बसविला पाहिजे. उद्यानातील झाडांपासून तयार केलेल्या प्राण्यांच्या प्रतिकृतींची दुरवस्था झालेली आहे. काही वेळेस उद्यानात टवाळ पोरे पत्ते खेळताना व मद्यपान करताना दिसतात. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. लॅंडस्केपिंगचे पुन्हा रिन्युवेशन झाले पाहिजे. 

सहल केंद्रात येणाऱ्या नागरिकांनीही सहल केंद्राचे पावित्र्य राखण्यास मदत केली पाहिजे. पूर्वी या सहल केंद्रात पदपथावर जमिनीपासून चार फुटाच्या उंचीवर शोभेच्या दिव्यांबरोबरच साउंड सिस्टिम बसविण्यात आली होती. या साउंड सिस्टिमद्वारे रेडिओ तसेच इतर कर्णमधुर गाणीही लावली जात. मात्र त्याची आता पूर्णतः दुरवस्था झाली आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांपैकी काहींनी त्याची नासधूस केल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. नागरिकांनी केंद्रात स्वच्छता ठेवण्यासाठीही मदत करणे गरजेचे आहे.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सहल केंद्रासारखी आणखी उद्यानाची निर्मिती होणे गरजेचे आहे. ही उद्यानेच पुढे शहराचा प्राणवायू ठरणार आहेत. त्याचप्रमाणे आबालवृद्धांचे विरंगुळा केंद्रही ठरणार आहेत. भोसरीतील हे सहल केंद्र येथे येणाऱ्या पर्यटकांना काही वेळ आलेला ताणतणाव विसरण्यासाठी निश्‍चितच मदत करेल हे निश्‍चित. त्यामुळे पर्यटकांनी एकदा तरी या सहल केंद्राला नक्कीच भेट दिली पाहिजे.

Web Title: bhosari news bhosari tour garden