भोसरीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्केटिंग रिंक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

भोसरी - येथील इंद्रायणीनगर प्रभाग क्रमांक आठमध्ये पेठ क्रमांक तीनमध्ये दीड एकर जागेत दोनशे मीटर लॅपिंग असणारे आंतरराष्ट्रीय स्केटिंग रिंक तयार करण्यात येत आहे. येत्या दोन महिन्यांत हे काम पूर्ण होणार असून, शहरातील स्केटिंगप्रेमींना खेळण्यासाठी उत्तम सुविधा निर्माण होणार आहेत.

भोसरी - येथील इंद्रायणीनगर प्रभाग क्रमांक आठमध्ये पेठ क्रमांक तीनमध्ये दीड एकर जागेत दोनशे मीटर लॅपिंग असणारे आंतरराष्ट्रीय स्केटिंग रिंक तयार करण्यात येत आहे. येत्या दोन महिन्यांत हे काम पूर्ण होणार असून, शहरातील स्केटिंगप्रेमींना खेळण्यासाठी उत्तम सुविधा निर्माण होणार आहेत.

भोसरी सर्व्हे क्रमांक तीनमध्ये ई प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाच्या पाठीमागे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती केंद्राचे काम प्रगतिपथावर आहे. इंद्रायणीनगरात ऑलिंपिक धर्तीवरील जलतरण तलावाचे कामही प्रस्तावित आहे. आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्केटिंग रिंकचे कामही प्रगतिपथावर असल्याने भविष्यात शहरातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होण्याची आशा निर्माण झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहर परिसरात अद्ययावत स्केटिंगचे रिंक नसल्याने सरावासाठी खेळाडूंना पुण्यात जावे लागते. या स्केटिंग रिंकमुळे खेळाडूंना पुण्याला न जाता या ठिकाणीच आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

स्केटिंग रिंकबाबत
 सेक्‍टर क्रमांक तीन
 दीड एकर जागेत
 दोनशे मीटर लॅप (एकूण अंतर)

सद्यःस्थिती
 स्केटिंग रिंकला आकार देण्याचे काम सुरू
 दोन महिन्यांपर्यंत पूर्ण होणार
 प्रसाधनगृहाचे काम सुरू
 सीमाभिंतीचे काम प्रगतिपथावर

खर्च
 स्केटिंग रिंक  सत्तर लाख रुपये
 प्रसाधनगृह - दहा लाख
 सीमा भिंत - अडतीस लाख
 एकूण - एक कोटी अठरा लाख

फायदे
 स्केटिंगमध्ये राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होणार
 ऑलिंपिक दर्जाची स्केटिंग स्पर्धा घेता येणार
 एकाच वेळेस दहा स्पर्धक भाग घेऊ शकणार

पुण्यात कासारसाई आणि विमाननगर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्केटिंग रिंक आहेत. आता या रिंकमुळे भौगोलिकदृष्ट्या पुण्याच्या तीन कोपऱ्यांत रिंक होणार असल्याने सर्व खेळाडूंना उत्तम सोय निर्माण होणार आहे. भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय मानांकनाच्या रिंकचा सराव करता येणार आहे. स्केटिंगमध्ये छत्रपती पुरस्कार मिळविणारे खेळाडू अधिक आहेत. आता या संख्येत पुन्हा वाढ होईल.
- राहुल राणे, स्केटिंग कोच व आंतरराष्ट्रीय खेळाडू

आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्केटिंग रिंक उभारण्याचा पिंपरी-चिंचवड शहरातील पहिलाच प्रकल्प आहे. आंतरराष्ट्रीय नियमावलीप्रमाणे या स्केटिंग रिंकची उभारणी करण्यात येत आहे. येत्या दोन महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात येईल. 
- संजय घुबे, कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग, क क्षेत्रीय कार्यालय

Web Title: bhosari pune news international skating rink