भोसरी दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

पिंपरी - महापालिकेच्या भोसरी सहल केंद्रातील जलतरण तलावात पोहताना तरुणाचा बुडून मृत्यू झाल्या प्रकरणाची महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गंभीर दखल घेतली आहे. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. येत्या आठवड्यात अहवाल देण्याचे आदेश त्यांनी समितीला दिले आहेत. 

या केंद्रातील जलतरण तलावात पोहताना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सनी बाळासाहेब ढगे याचा बुडून मृत्यू झाला. जीवरक्षकांचा निष्काळजीपणा त्यास जबाबदार असल्याचा आरोप कार्यकर्ते सम्राट फुगे यांनी केला आहे. तसेच या प्रकाराची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. 

सम्राट फुगे म्हणाले, ‘‘दुर्घटना घडली तेव्हा तलावात जवळपास ८० जण पोहत होते. सनीला फिट येण्याचा त्रास आहे किंवा नाही याची माहिती मला नाही. त्याचे कुटुंबीय सांगू शकतील. परंतु, फिट येऊन पाण्यात पडल्याचे त्याला कोणी पाहिले नाही. तो तलावाच्या तळालाच पडलेला दिसला. मग, त्याला फिट आली, असे कसे म्हणता येईल ?’’ 

पालिकेचे सहाय्यक आयुक्त (क्रीडा) नितीन कापडणीस म्हणाले, ‘‘कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबित का करू नये? अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस तलावाचे लिपिक, २ जीवरक्षक आणि २ मदतनीस यांना यापूर्वीच बजाविण्यात आली आहे. याखेरीज, आयुक्तांनी त्रिसदस्यीय समिती नेमण्याचे निर्देश दिले आहेत. या समितीत अग्निशामक दलाचे अधिकारी किरण गावडे आणि आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांचा समावेश करण्यात आला आहे. मृत व्यक्तीला कोणता त्रास होता किंवा नाही हे शवविच्छेदन अहवाल आल्यावरच स्पष्ट होऊ शकेल.’’

भोसरीतील दुसरी दुर्घटना 
या तलावात याच महिन्यात बांधकाम व्यावसायिक किरण लांडगे हे पोहताना क्‍लोरिनचा त्रास होऊन बेशुद्ध पडले होते. त्यानंतर, ही दुसरी दुर्घटना घडली आहे. 

सनीला फिटचा त्रास?
सनी ढगे याला फिटचा त्रास होता, तसेच त्याने तलावात उतरण्यापूर्वी नशा केल्याचा दावाही क्रीडा विभागाने केला आहे. त्याच्या पोटावर शस्त्रक्रियाही झाल्याचे या विभागाचे म्हणणे आहे.

Web Title: bhosari swimming tank accident inquiry committee