पदपथ व्यापले पथारीवाल्यांनी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 एप्रिल 2017

भोसरी - भोसरीतील जवळपास सर्वच रस्त्यांच्या पदपथावर पथारीवाले, टपरीधारक, वस्तू विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे भोसरीतील पदपथ हे पादचाऱ्यांसाठी नसून विविध वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांसाठीच असल्याचे चित्र भोसरी परिसरात दिसते. पदपथावर झालेल्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना जीव धोक्‍यात घालून मुख्य रस्त्याने चालण्याची वेळ येत आहे. ही अतिक्रमणे हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

पुणे-नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यावर खंडोबामाळ, गव्हाणेवस्ती आदी भागातील सेवा रस्त्यावर वाळू, वीट, सिमेंट, खडी मालकांनी अतिक्रमण केले आहे. धावडेवस्तीजवळील सेवा रस्त्यावर भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण तर भोसरी-आळंदी रस्ता चौकाजवळ फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण झालेले दिसते. पीसीएमसी चौक ते लांडेवाडीतील अग्निशमन केंद्रेपर्यंतच्या पदपथावर चायनीज सेंटर तसेच कापड विक्रेत्यांबरोबरच फळविक्रेत्यांचे अतिक्रमण झालेले दिसते. विशेष म्हणजे या पदपथावर अनधिकृतपणे उभारलेल्या बऱ्याच टपऱ्या आहेत. आळंदी रस्त्यावरील पदपथावर व्यापाऱ्यांनी विक्रीच्या विविध वस्तू ठेवून अतिक्रमण केले आहे. या रस्त्यावरील पदपथावरील अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना मुख्य रस्त्याने चालावे लागते. त्यामुळे भोसरीतील पदपथ हे विक्रेत्यांसाठी आहेत की पादचाऱ्यांसाठी बांधलेत हे महापालिकेने स्पष्ट करण्याची मागणी पादचाऱ्यांनी केली. 

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाद्वारे पदपथावरील विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत होती. मात्र, कारवाई झाल्यानंतर तासाभरातच पुन्हा पदपथावर विक्रेत्यांचे अतिक्रमण झालेले दिसते. त्यामुळे अतिक्रमणविरोधी कारवाईनंतर त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमणे होऊ नयेत, यासाठी महापालिकेने खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे मत काही नागरिकांनी व्यक्त केले.

काय करायला हवे?
 अतिक्रमणांवर सतत कारवाई करावी.
 हातावर पोट असलेल्या विक्रेत्यांचे पुनर्वसन करावे.
 हॉकर्स व नो हॉकर्स झोन तयार करावे.
 नियम मोडणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी.
 विक्रेत्यांसाठी कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील जागा द्यावी.

Web Title: Bhosari traffic issue