भूमकर चौक अडकला कोंडीत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

सर्व्हिस रोड व्हावेत खुले
चौकामध्ये पुनावळे, वाकड, ताथवडे, हिंजवडी आदी सर्व्हिस रोड आहेत. ते अन्य वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येतात. मात्र, सकाळी व संध्याकाळी रहदारीवेळी प्रत्येकी दोन तास खुले केल्यास वाहतूक कोंडी टाळता येईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. 

पिंपरी - कुचकामी सिग्नल यंत्रणा, अरुंद रस्ते, पोलिसांचे अपुरे संख्याबळ, बेशिस्त वाहतूक ही भूमकर चौकाची कैफियत. ‘लेन कटिंग’ करून अचानक समोरा-समोर वाहने येऊन कैक तास होणारी होणारी वाहतूक कोंडी हे येथील नेहमीचेच चित्र. मात्र, या सर्वांत हिंजवडी आयटी पार्क; तसेच पिंपरी- चिंचवड परिसरातील नोकरदार व स्थानिकांना त्याचा त्रास होतो.

हिंजवडी आयटी पार्क व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या विकासानंतर भूमकर चौक खऱ्या अर्थाने नावारूपास आला. मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग, हिंजवडी- चिंचवड मुख्य मार्ग आणि पुनावळे, वाकड, ताथवडेकडे जाणारे सर्व्हिस रोड अशा विविध आठ रस्त्यांचे जाळे या चौकात विणले गेल्याने हा चौक कायमच वर्दळीचा असतो. तुलनेने चौकामध्ये वाहतुकीचे नियोजन केलेले नाही. बुहतांश वेळा सिग्नल यंत्रणा बंदच असल्याने वाहतूक समस्या अधिकच बिकट होते. वाहतूक पोलिस वाहतुकीचे नियमन करतात. मात्र, बेशिस्त वाहनचालक पोलिसांनाही जुमानत नसल्याने सर्व्हिस रोडवरून दुहेरी वाहतूक सुरू असते. रहदारीमुळे वाहतूक पोलिसांची भंबेरी उडते. इंदिरा किड्‌स शाळेसाठी पुनावळेकडून सर्व्हिस रोड दुहेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या रस्त्यावरून शाळेच्या तब्बल ५० बस धावत असल्याने डोकेदुखीत अधिकच भर पडते. 

दुभाजकांची रुंदी कमी करा 
हिंजवडी-चिंचवड मार्ग चौपदरी आहे. मात्र, हे रस्ते अरुंद असून, दुभाजक मात्र रुंद असल्याने चौपदरी रस्ते असून वाहतूक समस्या जैसे थेच आहे. उलटपक्षी या दुभाजकांजवळ हिंजवडी आयटी पार्कमधील कर्मचारी कंपनीच्या वाहनांच्या प्रतीक्षेत उभे असतात. या कर्मचाऱ्यांना घेण्यासाठी आलेली वाहने रस्त्यातच उभी केली जातात. त्यामुळेही वाहतुकीचा मोठा खोळंबा होतो. दुभाजकांची रुंदी कमी करावी, अशी येथील स्थानिकांची मागणी आहे. 

पदपथ गिळंकृत
डांगे चौक व हिंजवडीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील पदपथ अतिक्रमणांनी गिळंकृत केल्याने पादचाऱ्यांना जीव धोक्‍यात घालून रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. परिणामी, वाहतुकीच्या समस्येत अधिकच भर पडते. 

भूमकर चौकामध्ये आठ वाहतूक पोलिसांना नेमले आहे. मात्र, सकाळी व संध्याकाळी एकाच वेळी वाहनांची गर्दी होत असल्याने त्यांच्यावर ताण येतो. अनेक बेशिस्त चालक चारही सर्व्हिस रोडचा दुहेरी वापर करत असल्याने कोंडी होते; तर महामार्गासाठी बांधलेला पूल लहान असल्याने त्यातून मोठी वाहने जाताना अडथळा निर्माण होतो.
- डी. ए. पाटील, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग

Web Title: Bhumkar chowk traffic jam