सातारा रस्त्यावरील बीआरटीसाठी कोट्यवधींचा खर्च 

satara-katraj-brt
satara-katraj-brt

स्वारगेट - स्वारगेट ते सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गासाठी 500 कोटी रुपयांचा खर्च झाल्यानंतरही याच मार्गावर पुढील दोन महिन्यांत आणखी 75 कोटी रुपयांची डागडुजी होणार आहे. मात्र, बीआरटी मार्गातून बस धावण्याचा मुहूर्त प्रशासनाला सांगता आलेला नाही. दरम्यान, शहरात बीआरटीचे मूळ धोरण राबविणार असल्याचे महापालिकेच्या प्रभारी आयुक्त रुबल अगरवाल यांनी स्पष्ट केले. 

स्वारगेट ते कात्रज या सहा किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी बीआरटी मार्गाची मूळ बांधणी, त्यावरील आक्षेप अन्‌ भरमसाट खर्च करूनही हा मार्ग कसा फसला आहे, याकडे "सकाळ'ने वृत्तमालिकेद्वारे प्रकाशझोत टाकला. त्यानंतर महापालिकेने ही योजना सावरण्याचा प्रयत्न चालविला आहे. परंतु, त्यातही आता कोट्यवधी रुपयांच्या खर्चाचा घाट घातला आहे. 

आधी कोट्यवधी रुपयांमधून उभारलेल्या मार्गिका, बसथांबे, बॅरिकेड आणि मार्गालगतचा पदपथ उखडून संपूर्ण मार्गाची पुनर्बांधणी करण्याची योजना मांडली आहे. त्यासाठी निविदा, कामे आणि पुन्हा खर्चाच्या आकड्यांची मालिका सुरू राहिली. त्यामुळे हा मार्ग शोभेपुरताच राहिला. अनेकदा अपघात घडल्याने बीआरटी मार्ग जीवघेणा ठरल्याचे दिसून आले. एवढे सगळे झाल्यानंतरही जवळपास 100 कोटींची नवीन कामे दाखवून तो खर्च करण्यात येत आहे. त्यासाठी आणखी दोन महिने हवेत, असा आग्रह महापालिकेचे अधिकारी धरत आहेत. त्यामुळे या मुदतीत तरी बीआरटी पुणेकरांच्या सेवेत येईल का? याची उत्सुकता पुणेकरांना लागली आहे. 

बीआरटी हा सार्वजनिक वाहतुकीतील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे नियोजित वेळेत ती आम्ही पूर्ण करणार आहोत. 
- मुरलीधर मोहोळ, महापौर 

निकृष्ट दर्जाच्या पीएमपी आणि वाहतूक कोंडीत बस सापडत असल्याने ठरावीक वेळेत इच्छित ठिकाणी पोचता येत नसल्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. यावर बीआरटी हाच पर्याय आहे. उत्तम दर्जाची बीआरटी बनविल्यास आणि त्यातून भरपूर बसेस सोडल्यास नागरिक निश्‍चितपणे या सुविधेचा वापर करतील. 
- हर्षद अभ्यंकर, वाहतूकतज्ज्ञ 

आमचे प्राधान्य बीआरटीलाच आहे. लेनच्या बाजूने रेलिंग कॉरिडॉर उभा करून बीआरटीसाठी वेगळी लेन करणार आहोत. स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्गावर 10 बसथांबे आहेत. त्यापैकी सात उभे असून, तीन उभारण्याचे काम सुरू आहे. हे काम दोन महिन्यांत पूर्ण होईल. पदपथासह इतर कामे सुरूच राहतील. मे महिन्यापर्यंत बीआरटी सुविधांसह उपलब्ध होऊन त्यामधून बस धावतील. 
- अनिरुद्ध पावसकर,  प्रमुख, पथ विभाग, महापालिका 

सार्वजनिक वाहतुकीमधील कमी खर्चीक प्रयोग म्हणजे बीआरटी योजना आहे. चालकांना सोईस्कर, प्रवाशांना सुखकर अशी बीआरटी असून, त्यामुळे बसची झीज कमी होते; त्याचबरोबर इंधनबचतही होते, असे अनेक फायदे आहेत. अहमदाबादमध्ये अरुंद रस्त्यांवरही एकेरी बीआरटी केली असून, तो प्रयोग यशस्वी झाला आहे. 
- अनंत वाघमारे, व्यवस्थापक, बीआरटी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com