पक्ष्यांचे विश्‍व उलगडत महोत्सवाची सांगता 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

प्रतिकूल वातावरणाशी जुळवून घेणारे आकर्षक पक्ष्यांचे एक-एक स्लाइड डोळ्यांपुढे सरकत पुणेकरांना जगातल्या पक्ष्यांची शास्त्रीय माहिती मिळाली. निमित्त होते सहाव्या पक्षी महोत्सवाचे. 

पुणे - पृथ्वीचे दोन्ही ध्रुव, सहा खंडांतील 22 देशांमधील पक्ष्यांची निरीक्षणे पुणेकरांनी रविवारी अनुभवली. प्रतिकूल वातावरणाशी जुळवून घेणारे आकर्षक पक्ष्यांचे एक-एक स्लाइड डोळ्यांपुढे सरकत पुणेकरांना जगातल्या पक्ष्यांची शास्त्रीय माहिती मिळाली. निमित्त होते सहाव्या पक्षी महोत्सवाचे. 

नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्टने पक्षी महोत्सव आयोजित केला होता. त्याचा रविवारी समारोप झाला. त्यात पक्षिनिरीक्षक विक्रम पोतदार यांनी "जगभरातील पक्षिनिरीक्षक' या विषयावर दृक्‌-श्राव्य माध्यमातून सादरीकरण केले. "सकाळ' हे या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

"पक्ष्यांचे कृत्रिम घरटे' या विषयावर बोलताना विश्‍वजित नाईक म्हणाले, ""शहरीकरणामुळे पक्ष्यांचे अधिवास धोक्‍यात आहेत. त्यामुळे कृत्रिम घरट्यांची गरज वाढली आहे. पक्ष्यांना आवडणाऱ्या झाडांची लागवड करणे, ही काळाची गरज आहे.''  डॉ. पंकज कोपर्डे यांनी "पुणे परिसरातील पक्षिजीवन' याबद्दल माहिती दिली. 

डॉ. संजीव नलावडे म्हणाले, ""थायलंड, मलेशिया हा आशिया खंडातील सर्वांत मोठा स्थलांतरित पक्ष्यांचा मार्ग आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात पक्षी स्थलांतर करतात.'' पक्ष्यांच्या गणनेच्या पद्धतीचा शास्त्रीयदृष्ट्या घेतलेला आढावाही त्यांनी स्पष्ट केला. 

हेही वाचा  : मृत्यू झालेल्या कर्जदाराचे कर्ज माफ

महोत्सवानिमित्त सकाळी सिंहगड येथे पक्षिनिरीक्षण आयोजित केले होते. "नेचर वॉक'चे श्रीनिवास घैसास, शिरीष भिलवडकर व निशांत देशपांडे यांनी यात मार्गदर्शन केले. स्वर्गीय नर्तक, नीलमणी, पीतकंठी चिमणी, सर्प गरुड, मुनिया असे 25 प्रकारचे पक्षी दिसले. पक्ष्यांबरोबरच त्या पक्ष्यांच्या अधिवासाची ओळख करून देण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bird festival concludes

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: