येरवड्यातील पक्षी अभयारण्यात राडारोडा टाकणे सुरूच | Bird Sanctuaries | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Garbage
येरवड्यातील पक्षी अभयारण्यात राडारोडा टाकणे सुरूच

येरवड्यातील पक्षी अभयारण्यात राडारोडा टाकणे सुरूच

लोहगाव - येरवड्यातील डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्यात टाकण्यात येत असलेल्या राडारोडा प्रकरणी पालिकेकडून पोलिसांकडे तक्रार देण्याव्यतीरिक्त काहीच कारवाई झालेली नाही. याउलट याठिकाणी राडारोडा टाकण्याचे काम अद्यापही दिवसाढवळ्या बिनदिक्कतपणे सुरू आहे. या संपूर्ण प्रकारामुळे पालिका अधिकारी व राडारोडा टाकणाऱ्यांमध्ये मिलीभगत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

येरवड्यातील मुळामुठा नदीकिनारी २२ ते २५ एकरात असलेल्या डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्यात नाला बुजवून हजारो ट्रक राडारोडा टाकण्यात आला आहे. याबाबत प्रशासनाला जागे करण्यासाठी डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्य बचाव समितीच्या वतीने मागील ३० ऑक्टोबरला येथील गुंजन चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, आमदार सुनील टिंगरे, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार आदींनी याबाबत त्वरित कारवाईचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.

हेही वाचा: अमृता विद्यापीठातर्फे विद्यार्थिनींसाठी अल्गोक्वीन कोडिंग स्पर्धा

मात्र, त्यानंतर अद्याप याबाबत पालिका प्रशासनाने केवळ दोषींना नोटीस काढून त्यांच्याविरोधात तक्रार देण्याशिवाय काहीच केलेले नाही. त्यावेळी खेमणार यांनी नाल्यातील राडारोडा त्वरित हटवून नाला पूर्ववत करणार असल्याचे सांगितले होते. मात्र अद्यापही नाला पूर्ववत करण्याचे लांबच, याठिकाणी राडारोडा टाकण्याचे कामही बंद करण्यात आलेले नाही. त्यामूळे दिवसेंदिवस नदीपात्र व अभयारण्यातील जागा राडारोडा टाकून गिळंकृत होत आहे.

याबाबत डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्य बचाव समितीचे सदस्य समीर निकम म्हणाले, पालिकेने येरवडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत राडारोडा टाकणाऱ्यांचा उल्लेख संबंधित जागेचे मालक म्हणून केला आहे. मात्र या व्यक्तींचा या जागेशी काहीच संबंध नाही. तसेच आजही याठिकाणी राडारोडा टाकला जात असून अभयारण्याचा गळा घोटला जात आहे. या संपूर्ण प्रकारामुळे पालिका प्रशासन दोषींना पाठीशी घालत असल्याचे दिसून येते. मात्र आम्ही गप्प बसणार नसून आमचे आंदोलन सुरूच राहिल. याविषयी दोषींविरोधात वरिष्ठांकडे दाद मागण्यात येईल.

loading image
go to top