बिटकॉइन फसवणूकप्रकरणी लुकआउट नोटीस जारी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

पुणे - बिटकॉइन या आभासी चलन फसवणूक प्रकरणातील उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी आता दिसताक्षणी अटक करण्याची (लुकआउट नोटीस) नोटीस न्यायालयाने काढली आहे. त्यादृष्टीने पुणे पोलिसांच्या सायबर विभागाची दोन पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. 

पुणे पोलिसांच्या सायबर शाखेने बिटकॉइन फसवणूक प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अमित भारद्वाज व त्याचा भाऊ विवेक भारद्वाज यांना अटक केली आहे. मात्र, हे भारद्वाज बंधू वगळता त्यांच्या कंपनीतील "सेव्हन स्टार' पैकी उर्वरित व्यक्‍तींना अटक करण्यात आलेली नाही. "सेव्हन स्टार'मध्ये भारद्वाज यांच्या वडिलांसह अन्य काही जणांचा समावेश आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत मुख्य आरोपींपैकी पाच आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडे तपासही सुरू आहे. मात्र, या प्रकरणाला अद्यापही पुरेशी गती मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत. 

या पार्श्‍वभूमीवर उर्वरित आरोपींच्या शोधासाठी सायबर शाखेची दोन शोध पथके रवाना झाली आहेत. संबंधित आरोपींविरुद्ध न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. याबरोबरच दिसताक्षणी अटक करण्याची नोटीसही काढली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, आत्तापर्यंत पुणे पोलिसांकडे 73 जणांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. त्याद्वारे 7 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. 
याप्रकरणी भारद्वाज बंधूंसह अटक केलेल्या आरोपींची संख्या आता 10 पर्यंत गेली असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: Bitcoin fraud case

टॅग्स