
उरुळी कांचन, ता. १८ : बिवरी (ता. हवेली) ग्रामपंचायत प्रशासन आणि एका स्थानिक ग्रामस्थाविरुद्ध तीन स्थानिक ग्रामस्थांनी थेट पंचायत समितीकडे खोट्या तक्रारी दाखल केल्यानंतर स्थळ पाहणी न करताच गटविकास अधिकाऱ्यांनी देखील अधिकृत असलेले बांधकाम अनधिकृत ठरवत दोन वेळा पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सकाळ प्रतिनिधींनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केल्यानंतर ही माहिती हाती लागली आहे.
बिवरी (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या गावठाण हद्दीत किसन जवळकर यांनी सार्वजनिक स्वच्छतागृह जाणारा खासगी रस्ता हा बंद करून अनधिकृत पक्के बांधकाम करून अतिक्रमण केल्याची तक्रार पवन पवार, सागर रघुवंत आणि गणेश चारूडे यांनी हवेली पंचायत समितीला लेखी स्वरूपात दिली होती. याबाबत पंचायत समितीने स्थळ पाहणी न करताच अतिक्रमण काढण्याचा आदेश ग्रामपंचायत प्रशासनाला दिला. तत्पूर्वी २०२२, २०२३ साली किसन जवळकर यांच्या अधिकृत बांधकाम केलेली भिंत ग्रामपंचायत प्रशासनाकडून कारवाई करून तोडण्यात आली होती.