भाजपचा राष्ट्रवादीवर "हल्लाबोल' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

पुणे  - भारतीय जनता पक्षाच्या खासदारांच्या लाक्षणिक उपोषणात राष्ट्रवादी कॉंग्रेसवर "हल्लाबोल' करण्यात आला. संसदेत 44 खासदार असलेल्या कॉंग्रेसपेक्षाही सहा खासदारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला पुण्यात या निमित्ताने झालेल्या भाषणांमध्ये लक्ष्य करण्यात आले. 

पुणे  - भारतीय जनता पक्षाच्या खासदारांच्या लाक्षणिक उपोषणात राष्ट्रवादी कॉंग्रेसवर "हल्लाबोल' करण्यात आला. संसदेत 44 खासदार असलेल्या कॉंग्रेसपेक्षाही सहा खासदारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला पुण्यात या निमित्ताने झालेल्या भाषणांमध्ये लक्ष्य करण्यात आले. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेचे कामकाज फक्त 43 तास, तर राज्यसभेचे 45 तास होऊ शकले. विरोधकांनी गदारोळ केल्याने दोन्ही सभागृहांचे मिळून कामकाजाचे 248 तास वाया गेले. विरोधकांच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी देशभरात निवडून आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी आपापल्या मतदारसंघांत लाक्षणिक उपोषण केले. पुण्यातही जंगलीमहाराज रस्त्यावर संभाजी बागेजवळ उपोषण करण्यात आले. त्यात खासदार अनिल शिरोळे यांच्यासह खासदार संजय काकडे, आमदार विजय काळे यांच्यासह महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक, पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

बहुतांश नेत्यांच्या भाषणाची सुरवात "कॉंग्रेसकडे गेली 60 वर्षे देशाची सत्ता होती,' या विधानाने होत होती; तर त्यानंतर भाषणातील बराचसा भाग हा राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीकेचा होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसने नैराश्‍यातून हल्लाबोल आंदोलन सुरू केले असून, त्याला जनतेचा पाठिंबा मिळत नसल्याचे स्पष्ट केले जात होते. काही मोजक्‍या वक्‍त्यांनीच या आंदोलनामागची भूमिका सांगितली. 

शिरोळे म्हणाले, ""शहरात उपोषणाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आमदार, लोकप्रतिनिधी यात सहभागी झाले. विरोधकांनी संसदेचे कामकाज होऊ दिले नाही. सरकार त्यांच्याशी चर्चेला तयार होते. मात्र, विरोधकांना चर्चा करायची नव्हती. त्यामुळेच त्यांनी कामकाजात अडथळे आणले.'' 

Web Title: BJP attacks NCP