धक्के खाणार की ‘धक्का’ देणार?

Batmichya-Palikade
Batmichya-Palikade

भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा काँग्रेस आघाडीचा प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यातील लोकसभेच्या जागावाटपात दोन्ही काँग्रेसमध्ये विविध पातळीवर चर्चा-विचारविनिमय होत आहे. त्यामुळेच पुण्यातील काँग्रेसचा उमेदवार ठरविताना राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक असेल. पुण्याचा उमेदवार सामाजिक पातळीवर प्रभाव टाकणारा असावा आणि त्याच्या या इमेजचा उपयोग राज्यातील आघाडीच्या इतर उमेदवारांनाही व्हावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.  त्यामुळेच पुण्यातील काँग्रेसच्या उमेदवाराबाबत अखेरच्या क्षणापर्यंत उत्सुकता असणार, हे नक्की.

भारत-पाकिस्तान या देशांमध्ये तणाव असला, तरी लोकसभेच्या निवडणुका वेळेतच पार पडतील, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात निवडणुकांच्या तारखांची घोषणा होईल. या तारखा गृहीत धरून प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जवळ-जवळ निश्‍चित केले आहेत. जवळपास ७० टक्के उमेदवार निश्‍चित असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या जागांवर पक्षांतर्गत कमालीची स्पर्धा आहे, आघाडी-युतीमध्ये जेथे एकमत होत नाही, ज्या ठिकाणी युती-आघाडीतील पक्षांची ताकद कमी-जास्त आहे, अशा ठिकाणचे उमेदवार शेवटच्या टप्प्यात ठरतील. या सर्व निकषांचे पुणे उत्तम उदाहरण आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांचे उमेदवार त्यामुळेच शेवटच्या क्षणी ठरतील. 

पुण्यातील जागा जरी काँग्रेसकडे असली, तरी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव, शरद पवार यांचा प्रदीर्घ अनुभव आणि राजकीय कौशल्यामुळे उमेदवार ठरविताना राष्ट्रवादीच्या भूमिकेला तेवढेच महत्त्व असते. सध्या काँग्रेसची शहरातील स्थिती फारशी बरी नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सर्व प्रकारच्या सहकार्याशिवाय विजयापर्यंत पोचणे अशक्‍य आहे, हे काँग्रेसलाही माहिती आहे. सध्या उमेदवारीसाठी जी काही नावे येत समोर येत आहेत, त्यावर काँग्रेसमध्येच एकमत नाही. अद्याप पुण्यात काहीतरी चमत्कार घडवेल, असे नावही पक्षाकडे नाही. त्यामुळेच पक्षातील नावांसोबतच पक्षाबाहेरील इच्छुकांचीही चाचपणी होत आहे. 

प्रदेश काँग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशी, अभय छाजेड आणि अरविंद शिंदे यांची नावे पुढे करण्यात आली आहेत. त्यावर माजी आमदार उल्हास पवार यांनी नाराजी व्यक्त करीत आपणही इच्छुक असल्याचे सांगितले. याशिवाय, भाजपकडून उमेदवारीची आशा मावळलेले खासदार संजय काकडे काँग्रेस उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्नशील आहेत. 

‘नानाचं फायनल’ असे त्यांचे समर्थक सांगू लागले आहेत. या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर धक्कातंत्राचा वापर करीत प्रवीण गायकवाड यांच्या नावाचा समावेश काँग्रेस इच्छुकांच्या यादीत झाला आहे. गायकवाड यांच्या नावास राष्ट्रवादीचा होकार गृहीत धरण्यात येत आहे. याहून महत्त्वाचे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या स्वतंत्र ‘टीम’कडून गायकवाड यांचेच नाव पुढे आल्याचे सांगण्यात येत आहे.

आरक्षणाच्या निमित्ताने मराठा समाजामध्ये निर्माण झालेले वादळ, आरक्षण लागू करण्याचा भाजप सरकारचा निर्णय, त्यास मराठा युवकांकडून गावोगाव मिळत असलेला सकारात्मक प्रतिसाद या पार्श्‍वभूमीवर या समाजातील नव्या चेहऱ्याला संधी द्यावी, असा विचार काँग्रेसकडून मांडला जात आहे. पुण्याचा उमेदवार निश्‍चित करताना या सर्व बाबींचा विचार होईल, अशी शक्‍यता आहे. 

बारामती, माढासह विदर्भ-मराठवाड्यातील मराठा प्रभाव क्षेत्रावर परिणाम करणारा घटक यादृष्टीनेही पुण्याच्या जागेचा विचार केला जात आहे. त्यामुळेच पुण्याच्या जागेसाठी पुन्हा एकदा सर्व शक्‍यतांची पडताळणी होत आहे. त्यामुळे पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या जुन्यांना संधी द्यायची की धक्कातंत्राचा वापर करून नवा प्रयोग करायचा?, हे ठरविणे काँग्रेससाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com