
मे महिन्यांमध्ये निकाल लागला. भाजप जिंकला. सगळीकडे गुलाल उधळला, पेढे वाढले, फुगड्या खेळल्या. मात्र, एकालाही भाईंची आठवण आली नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत विविध अडचणी, मागण्या घेवून येणाऱ्या लोकांच्या गर्दीने भरून जाणाऱ्या बंगल्याच्या आवारापर्यंत एक पेढासुद्धा पोहोचला नाही. आता गर्दी आटली आहे.
पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातील विजयाने पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पक्षाने जल्लोष केला. तसेच विधानसभा निवडणुकीत पुन्हा गुलाल उधळण्याची तयारी केली आहे. या साऱ्या कल्लोळात पक्षाचा शहरातील बलाढ्य नेता आझम पानसरे यांचा दरबार मात्र सुनासुना राहिला. काही वर्षांपूर्वीपर्यंत त्यांच्या शब्दाशिवाय राजकारण चालत नसे; मात्र डिसेंबरमध्ये जीवघेणा आजार ओढावल्याने राजकारणापासून थोडे दूर व्हावे लागले आणि आता साऱ्यांनाच त्यांचा विसर पडला आहे.
भाई म्हणजे शहराच्या राजकारणातील बडे प्रस्थ. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निष्ठा. अजित पवारांचा प्रचंड विश्वास. याचमुळे भाईंच्या शब्दावर राजकारणातील सर्व घेतले जात. त्यामुळे त्यांच्या घरी महापालिकेतील पदाच्या आमिषाने सकाळपासून रात्री उशिरापर्यंत राबता असे. केवळ भाईंनी सांगितले म्हणून कित्येकजण महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती झाले. दिवसेंदिवस राजकीय ताकद वाढली. मग लोकसभा, विधानसभा लढविली; परंतू घात झाला. राजकारणात सर्वांनी पदे मिळवून घेण्यापुरता उपयोग करून घेतला. मात्र, भाईंना आमदार, खासदार होण्यासाठी निवडणुकीत साथ दिली नाही.
गेल्या सात आठ वर्षापासून त्यांचे पक्षात बिनसू लागले. आता त्यांच्या कायकर्त्यांनाच उमेदवारी, पदापासून डावलण्यास सुरूवात झाली. एक दिवस संतापाचा कडेलोट झाला. अजित पवारांवर आग ओकून राष्ट्रवादीला तिलांजली. ते काँग्रेसमध्ये गेले. कसलाश्या मंडळावर नियुक्ती झाली. तिथेही मन रमेना. मग पुन्हा घरवापसी. हळूहळू उमेदही खचली. कारण राजकारणात ज्युनिअर असलेले सिनीअर झाले. दरम्यान, 2017च्या महापालिका निवडणुकीत या "सिनीअर्स'नी आग्रह करून "भाजप'मध्ये घेतले. निवडणुक जिंकली. मात्र, दोन वर्षाच्या सत्ताकाळात या "सिनीअर्स'नी शहराचे दोन भाग केले. भाईंच्या वाट्याला काहीच नाही उरले.
दरम्यान, डिसेंबर 2018 मध्ये भाईंना हृदयविकाराचा त्रास होवू लागला. गुंतागुंत वाढली. तब्येत पूर्ण ढासळली. मागील मे मध्ये शस्त्रक्रिया झाली. या साऱ्या कालावधीत लोकसभा निवडणुक झाली. मात्र ती प्रचाराची धामधूम, नेत्यांच्या सभा, मतदानातील उत्साह साऱ्यांमध्ये ते कोठेही नव्हते. कारण दररोज रुग्णालयात ते झुंज देत होते.
मे महिन्यांमध्ये निकाल लागला. भाजप जिंकला. सगळीकडे गुलाल उधळला, पेढे वाढले, फुगड्या खेळल्या. मात्र, एकालाही भाईंची आठवण आली नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत विविध अडचणी, मागण्या घेवून येणाऱ्या लोकांच्या गर्दीने भरून जाणाऱ्या बंगल्याच्या आवारापर्यंत एक पेढासुद्धा पोहोचला नाही. आता गर्दी आटली आहे. बंगल्याच्या बाहेर नेत्यांच्या आलिशान मोटारींची रांग गायब झाली आहे. प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक़ पक्षाने, प्रत्येक नेत्याने भाईंचा वापर एकगठ्ठा मतदानासाठी केला. आता भाई बेदखल झाले आहेत.