भाजपच्या नेत्याची मनसेला ऑफर; शिवसेनेची जागा भरून काढणार?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 January 2020

भाजपबरोबरच युतीत सरकारमध्ये सामील झाले असते, तर शिवसेनेला आणखी मंत्रिपदे मिळाली असती.

पुणे : "एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. पक्षाने त्यांना यापूर्वी दहा वेळा संधी दिली. एकादा नाही दिली, तर काय होत नाही. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला आहे, असे म्हणता येणार नाही,' अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रविवारी (ता.5) आपले मत व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

"जुना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने आपली विचारधारा सोडली आहे. अशा वेळेस ती जागा भरून काढण्याची संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आहे,'' असे सांगत भाजपशी युती करण्याचा अप्रत्यक्ष प्रस्ताव दरेकर यांनी यावेळी मांडला.
 
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दरेकर यांचा वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, महापालिकेतील विरोधी पक्षनेते धीरज घाटे उपस्थित होते.

- महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पुन्हा नागपूरकडे, यांना मिळाले गृहमंत्रिपद

राज्यातील तीन पायाच्या सरकारवर यावेळी जोरदार टीका दरेकर यांनी केली. शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचे दाखवत त्यांना दिलेले आश्‍वासन पूर्ण करण्याची संधी मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना होती. मात्र ही संधी त्यांनी गमवली, असेही ते म्हणाले. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अजित पवार यांच्यासह अनेक मंत्र्यांना मंत्रिपदाची संधी देणे योग्य नाही, असेही एका प्रश्‍नाला उत्तर देताना ते म्हणाले. 

- Video : कॅप्टन कोहली म्हणाला, 'टी-20 वर्ल्डकप जिंकायचाय, तर...'

खडसे, बावनकुळे, तावडे यांच्यावरील अन्यायाबाबत विचारले असता, ते दरेकर म्हणाले, "पक्षाची एक सिस्टिम आहे. त्यामुळे पक्ष त्यांना नव्या जबाबदाऱ्या देईल. त्या कोणत्या द्यावयाच्या या निर्णय पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर होईल.'' सगळ्याच गोष्टींवरून या सरकारमध्ये गोंधळ आहे. शिवसेनेत अनेक आमदार आणि कार्यकर्ता नाराज आहेत. भाजपबरोबरच युतीत सरकारमध्ये सामील झाले असते, तर शिवसेनेला आणखी मंत्रिपदे मिळाली असती,' असेही त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.

- CAA : प्रियांका-राहुल यांनी दंगली घडविल्या; अमित शहा यांचा आरोप
 
महाविकास आघाडीवर टीका करताना दरेकर म्हणाले," जागा वाटप, बंगले वाटप आणि आता खाते वाटपावरून या सरकारमध्ये वाद सुरू आहेत. विरोधी पक्षनेता हे पद वैधानिक पद आहे. असे असताना मला दिलेला बंगलाही त्यांनी काढून घेतला. जनसंपर्क होऊ नये, हाच त्यामागे हेतू असल्याचे दिसून येते. विरोधीपक्षाशी हे सरकार सूडबुद्धीने वागत आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Pravin Darekar offered to MNS for alliance in Maharashtra Politics