esakal | राहुल कुल, हर्षवर्धन पाटील, पाचर्णे, भेगडे उतरले रणांगणात
sakal

बोलून बातमी शोधा

BJP

राज्य सरकारविरोधात भाजपने आज पुकारलेल्या आंदोलनात आमदार राहुल कुल, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्यासह जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी सहभाग घेतला.

राहुल कुल, हर्षवर्धन पाटील, पाचर्णे, भेगडे उतरले रणांगणात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्य सरकारविरोधात भाजपने आज पुकारलेल्या आंदोलनात आमदार राहुल कुल, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्यासह जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी सहभाग घेतला. सोशल डिस्टनसिंग नियमाचे पालन करून काळ्या फिती लावून, काळे झेंडे दाखवून सरकार विरोधी निदर्शने केली. 

मुंबईत कोरोना वाढतोय म्हणून इंदापूरला आले कुटुंब..

दौंडला सरकारविरोधी निदर्शने 
राहू : आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्र बचाओ आंदोलन केले. माजी आमदार रंजना कुल, कांचन कुल यांच्यासह कार्यकर्ते या आंदोलनास उपस्थित होते. आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख सर्वांनी आप आपल्या घराच्या अंगणात माझे अंगण हेच रणांगण या धोरणाने आपआपल्या अंगणात सोशल डिस्टनसिंग नियमाचे पालन करून काळ्या फिती लावून, काळे झेंडे दाखवून सरकार विरोधी निदर्शने केली. 

खडकवासला प्रकल्पात किती उरलंय पाणी

राज्य सरकारनेही पॅकेज द्यावे : पाटील 
इंदापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास राज्यातील महाआघाडी सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका करत माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व नीरा भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी निवासस्थानी काळा मास्क व काळे कपडे घालून निषेध केला.केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारने शेतकरी, मजुरांसाठी पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी पाटील यांनी केली. दरम्यान, इंदापूर शहर व तालुक्‍यात आंदोलनास जनतेने पाठिंबा दिल्याची माहिती भाजप तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे व शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी दिली. लासुर्णे  येथे युवा मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वाकसे यांच्यासह कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टनसिंगचे पालन करून आंदोलनामध्ये सहभाग घेतला. भिगवण, तक्रारवाडी, मदनवाडी गावांमध्येही सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी भाजपचे पश्‍चिम महाराष्ट्र कामगार आघाडीचे अध्यक्ष अशोक वणवे, उपाध्यक्ष दिनश मारणे, इंदापूर तालुकाध्यक्ष सचिन वाघ, पुजा वणवे, राजेश वनवे, शंकेश वणवे, रणजित खंडागळे आदींसह भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केला.  

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मंचरला काळ्या फिती लावून निषेध 
मंचर : आंबेगाव तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने शुक्रवारी मंचर ग्रामपंचायतीसमोर जिल्हा संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे, तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे व माजी तालुकाध्यक्ष संजय थोरात यांच्या नेतृत्वाखाली काळ्या फिती बांधून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकारला अपयश आल्याचा आरोप करण्यात आला. 

शिरूरमध्ये सरकारविरुद्ध थाळीनाद 
शिरूर : शिरूरचे माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांनी तोंडाला काळे मास्क लावून सरकारच्या ध्येयधोरणांचा फलक उंचावत निषेध केला. चव्हाणवाडी (ता. शिरूर) येथील निवासस्थानासमोर त्यांच्यासह भाजपचे जिल्हा सरचिटणीस ॲड. धर्मेंद्र खांडरे, शिरूर तालुका खरेदी - विक्री संघाचे संचालक आबासाहेब सोनवणे यांच्यासह मोजक्‍या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे फडकावत सरकार विरोधात घोषणा दिल्या. शहरात, भाजप कार्यालयाजवळ भाजप शहर अध्यक्ष नितीन पाचर्णे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, भाजप व्यापारी आघाडीचे तालुकाध्यक्ष बाबूराव पाचंगे, अल्पसंख्याक आघाडीचे शहर अध्यक्ष हुसेन शहा, सोशल मीडियाचे प्रमुख विजय नरके यांनी थाळीनाद केला; तसेच तहसीलदारांना निवेदन दिले. 

जेजुरी शहर भाजपातर्फे राज्य सरकारचा निषेध 
जेजुरी : जेजुरी शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने नंदी चौकात महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. जेजुरीत भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने जेजुरी शहर खंडोबा गडाच्या पायथ्याशी नंदी चौकात महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये या निष्क्रिय राज्य सरकारचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करण्यात आला. विषाणूंचा प्रादुर्भाव महाराष्‍ट्रात दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत आंदोलन करण्यात आल्याचे शहराध्यक्ष सचिन पेशवे यांनी सांगितले. यावेळी जेजुरी शहराध्यक्ष सचिन पेशवे, तालुका महिला अध्यक्षा अलका शिंदे, माजी सरचिटणीस प्रसाद अत्रे, राहुल झगडे, युवा नेते गणेश भोसले व कार्यकर्ते उपस्थित होते.