मुंबईत कोरोना वाढतोय म्हणून इंदापुरात आले कुटुंब, पण... 

डाॅ. संदेश शहा
Friday, 22 May 2020

इंदापूर तालुक्‍यात आतापर्यंत एकूण 5 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, तालुक्‍यात चिंतेचे वातावरण आहे. 

इंदापूर (पुणे) : इंदापूर तालुक्‍यातील पोंदकुलवाडी येथे मुंबईहून आलेल्या दोन रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे आज (ता. 22) अहवालावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्‍यात आतापर्यंत एकूण 5 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, तालुक्‍यात चिंतेचे वातावरण आहे. 

संत सोपान महाराज पालखी सोहळ्याबाबत मोठी मागणी  

मुंबई येथे कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन तीन जणांचे कुटुंब पोंदकुलवाडी येथे आपल्या मूळ गावी आले होते. त्यामध्ये 42 वर्षे महिला व 22 वर्षाच्या पुरुषास कोरोनाची लागण झाली आहे. भिगवण परिसरातील एका ज्येष्ठ महिलेला 28 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यात तिचा पुणे येथे औषधोपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. मात्र, हा मृत्यू कोरोनामुळे झाला नसल्याची चर्चा आहे. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या मृत्यूबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने या मृत्यूचे स्पष्टीकरण करणे गरजेचे आहे. त्यानंतर 16 मे रोजी मुंबई येथून इंदापूर तालुक्‍यात शिरसोडी येथे परतलेल्या मायलेकींना कोरोनाची बाधा झाली असून, त्यांच्यावर इंदापूरजवळील डॉ. कदम गुरुकुल येथे उपचार सुरू आहेत. 

पुरंदरकरांनो, कोरोना तुमच्या घरात येईल... 

इंदापूर तालुक्‍यात सध्या मुंबई, पुणे अशा हॉट स्पॉटमधून जवळपास अठरा हजारांहून जास्त नागरिक तालुक्‍यात झाले आहेत. शिरसोडी येथील दोन रुग्णांच्या नंतर केवळ सातच दिवसात आणखी दोन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे इंदापूरकरांच्या चिंतेत भर पडली आहे. या दोन्हीही रुग्णांचे पोंदकुलवाडीत त्यांच्या घरीच विलगीकरण करण्यात आले होते. मात्र, त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आता त्यांच्यावर डॉ. कदम गुरुकुल येथे उपचार केले जात असल्याची माहिती तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली. 

कोरोनाच्या लढाईत दौंडसाठी हा अहवाल ठरलाय... 

सध्या हे रुग्ण कोणाच्या संपर्कात आलेत का व त्यांच्या प्रवासाबाबत सखोल माहिती इंदापूर प्रशासनाकडून प्राप्त करण्याचे काम चालू आहे. पोंदकुलवाडीचा तीन किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला असून, त्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आला आहे. तहसीलदार मेटकरी, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा पोळ, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ चंदनशिवे यांनी पोंदकुलवाडी येथे भेट दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Indapur taluka, two members of a family from Mumbai contracted corona