शह-काटशहामुळे भाजपला फटका

मंगेश कोळपकर - @MkolapkarSakal
शुक्रवार, 3 मार्च 2017

शहरात भारतीय जनता पक्षाची लाट असतानाही कसबा पेठ- सोमवार पेठेत (प्रभाग १६) काँग्रेस पुरस्कृत उमेदवार रवींद्र धंगेकर धक्कादायक निकाल नोंदवत विजयी झाले. या प्रभागात भाजपचा एकमेव उमेदवार चार हजारांपेक्षा जास्त मतांनी निवडून येत असतानाच पक्षांतर्गत शह- काटशहच्या राजकारणामुळे पक्षाचा प्रतिष्ठेचा बिडकर यांच्यासारखा मोहरा मात्र, चार हजार मतांनी पराभूत झाला. शिवसेनेचा विजय सनसनाटी ठरला.

शहरात भारतीय जनता पक्षाची लाट असतानाही कसबा पेठ- सोमवार पेठेत (प्रभाग १६) काँग्रेस पुरस्कृत उमेदवार रवींद्र धंगेकर धक्कादायक निकाल नोंदवत विजयी झाले. या प्रभागात भाजपचा एकमेव उमेदवार चार हजारांपेक्षा जास्त मतांनी निवडून येत असतानाच पक्षांतर्गत शह- काटशहच्या राजकारणामुळे पक्षाचा प्रतिष्ठेचा बिडकर यांच्यासारखा मोहरा मात्र, चार हजार मतांनी पराभूत झाला. शिवसेनेचा विजय सनसनाटी ठरला.
या प्रभागात अ गटात शिवसेनेच्या पल्लवी जावळे, ‘ब’मध्ये धंगेकर, ‘क’ मध्ये काँग्रेसच्या सुजाता शेट्टी आणि ‘ड’गटात भाजपचे योगेश समेळ विजयी झाले. काँग्रेसकडून अनुक्रमे वैशाली रेड्डी, धंगेकर, शेट्टी आणि नितीन परतानी; शिवसेनेकडून अनुक्रमे जोतिबा शिर्के, जावळे, सुदर्शना त्रिगुणाईत आणि रवींद्र चव्हाण; मनसेकडून मनीषा सरोदे, राहुल तिकोने, संगीता तिकोने, प्रकाश वाबळे तर, भाजपने छाया वारभुवन, बिडकर, वैशाली सोनवणे आणि समेळ यांना उमेदवारी दिली होती. ब गटात एमआयएमकडून फय्याज कुरेशी, अपक्ष मुख्तार शेख, ग गटात जकिया शेख अपक्ष आणि ड गटात नगरसेवक अजय तायडे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात होते. धंगेकर, रेड्डी यांना काँग्रेसने, तर वारभुवन यांना भाजपने पुरस्कृत केले होते.

धंगेकर आणि बिडकर या दोन्ही नगरसेवकांचा घरोघरी संपर्क असल्यामुळे त्यांच्यातील लढतीबद्दल औत्सुक्‍य होते. बिडकर निवडून आले तर मोठी झेप मारणार, अशी शक्‍यता असल्यामुळे पक्षातील दोन नेत्यांनी विरोधी उमेदवाराला ‘रसद’ पुरविली, अशी चर्चा प्रभागातील कार्यकर्त्यांत आहे. धंगेकर विजयी होताना ब गटातील उमेदवारांमध्ये शेवटच्या क्षणी तडजोड झाल्याचे मतदानाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले. अ गटातही शिवसेनेच्या जावळे अवघ्या १२९ मतांनी विजयी झाल्या. क गटात शेट्टी अपेक्षेप्रमाणे विजयी झाल्या. भाजपचे पॅनेल पराभूत होत असतानाच समेळ चार हजारांहून अधिक मताधिक्‍याने विजयी झाले. विद्यमान नगरसेवक अजय तायडे खुल्या गटातून अपक्ष म्हणून उभे होते. त्यांनीही समेळ यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या गटात भाजपची लाट चालली आणि तायडेंच्या विकासाच्या मुद्द्याकडे मतदारांनी दुर्लक्ष केले.

६३ हजार मतदारांच्या या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार न देता चारही जागा काँग्रेसला दिल्या होत्या. त्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनाही अखेरच्या क्षणी एका नेत्याने धंगेकर यांच्याकडे हेतुतः वळविल्याचे सांगण्यात येत आहे. धंगेकर यांना रसद मिळाली, तरी त्यांचा जनसंपर्कही उपयुक्त ठरला, हेही वास्तव आहे.

Web Title: bjp loss by planning