भाजपच्या बैठकीत शांततेवर चर्चा 

BJP
BJP

पिंपरी : विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच होणाऱ्या शहर भारतीय जनता पक्षाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, रामजन्मभूमी, बाबरी मशीद विवादाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाहीर झाल्यानंतर शांतता पाळावी, असे आवाहन करण्यात आले. 

भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना बुधवारी (ता. 6) दुपारी बारा वाजता तातडीच्या बैठकीस हजर राहण्याचा निरोप मंगळवारी (ता. 5) सायंकाळी देण्यात आला होता. मात्र, बैठक कोणत्या कारणासाठी होणार आहे, विषयपत्रिका काय आहे, याविषयी गोपनीयता बाळगली होती. तसेच, बैठकीस उपस्थित राहणे बंधनकारक असल्याची ताकीदही दिली होती. त्यामुळे बैठकीत काय होणार, याची उत्सुकता सर्वांना होती. विधानसभा निवडणूक निकालानंतर भारतीय जनता पक्षाची ही पहिलीच बैठक होती. त्यामुळे चिंचवड मतदारसंघात पक्षाचे घटलेले मताधिक्‍य, पिंपरी मतदारसंघात महायुती उमेदवाराचा झालेला पराभव, भोसरी मतदारसंघात उमेदवाराविरोधात मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या तक्रारी, अनेक नगरसेवकांनी प्रचारात न घेतलेला सहभाग, अशा अनेक कारणांचा आढावा बैठकीत घेतला जाण्याची शक्‍यता होती. या अनुषंगाने कोणावर ठोस कारवाई होईल, याचीही चर्चा रंगली होती. मात्र, मोरवाडीतील पक्ष कार्यालयात प्रत्यक्ष बैठक सुरू झाली, त्या वेळी पक्षाचे शहराध्यक्ष व चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे अनुपस्थित होते. अर्ध्या-पाऊण तासाने त्यांचे आगमन झाले. तत्पूर्वी महापालिका स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, सभागृह नेते एकनाथ पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या समवेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्‍व हिंदू परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते. त्यात रामजन्मभूमी, बाबरी मशीद विवादाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाहीर झाल्यानंतर शांतता पाळावी, व्हॉट्‌सऍप, फेसबुक अशा सोशल मीडियावर भडक प्रतिक्रिया देणे अथवा पत्रकबाजी करणे, टीकाटिप्पणी करणे टाळावे. अशा कृत्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com