भाजपकडून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार

महेंद्र बडदे - @mahendra_badade
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यात भाजपला यश आले आहे. या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक बापूराव कर्णे गुरुजी यांना उमेदवारी देऊन भाजपने आपली सदस्यांची बेरीज वाढविली. प्रभागात कर्णे गुरुजी यांचे वर्चस्व राहिल्याचे मतमोजणीतून स्पष्ट झाले आहे.

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यात भाजपला यश आले आहे. या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक बापूराव कर्णे गुरुजी यांना उमेदवारी देऊन भाजपने आपली सदस्यांची बेरीज वाढविली. प्रभागात कर्णे गुरुजी यांचे वर्चस्व राहिल्याचे मतमोजणीतून स्पष्ट झाले आहे.

महापालिका वर्तुळात कर्णे गुरुजी हे नाव माहिती नाही, अशी व्यक्तीच दुर्मिळच म्हणावी लागेल. येरवडा-विमाननगर-सोमनाथनगर परिसरात त्यांनी कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविली, तरी ते निवडून येतात ही वस्तुस्थिती आहे. सर्वांत प्रथम ते अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवून निवडून आले होते. या वेळी ते भाजपचे कमळ हाती घेऊन मैदानात उतरले होते.

त्यात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या लढत होऊन कर्णे गुरुजी यांनी बाजी मारली. राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका उषा कळमकर यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच माजी नगरसेविकेचे पती आनंद सरवदे यांनाही पराभव पत्करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असलेला हा प्रभाग कर्णे गुरुजी यांच्या मदतीने जिंकण्याचा भाजपचा डाव यशस्वी ठरला.

निवडणुकीपूर्वी भाजपने कर्णे गुरुजी यांना पक्षात प्रवेश देऊन व्यूहरचना केली. या प्रभागात सर्वसाधारण (ड) गटातून कर्णे गुरुजी यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश आढाव, काँग्रेसचे भुजंग लहू, शिवसेनेचे प्रीतम खांदवे यांचे आव्हान होते. ते कर्णे गुरुजी यांनी सहज परतवून लावले. सर्वसाधारण महिला (क) गटात सर्वच उमेदवार नवोदित होते. केवळ माजी नगरसेविका मंदा खुळे या अपक्ष म्हणून रिंगणात होत्या. या गटात भाजपच्या मुक्ता जगताप यांनी बाजी मारली. 

नागरिकांचा मागास वर्ग-महिला (ब) गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुभवी नगरसेविका कळमकर, काँग्रेसच्या कविता शिरसाट, शिवसेनेच्या संध्या खेडेकर, भाजपच्या श्‍वेता खोसे यांच्यात लढत रंगली. मतमोजणीत सुरवातीला कळमकर यांनी आघाडी घेतली; पण नंतर त्या पिछाडीवर गेल्या. भाजपच्या खोसे या नवोदित उमेदवाराकडून त्यांना हार मानावी लागली. अनुसूचित जाती (अ) गटातून माजी नगरसेवक खरात, राष्ट्रवादीकडून सरवदे, काँग्रेसकडून रमेश सकट यांना पराभूत करीत राहुल भंडारे हे विजयी ठरले. 

या प्रभागात काँग्रेसने आघाडी केली असती, तर निश्‍चितच निकालात बदल झाला असता, असे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. ‘अ ’आणि ‘ब’ गटातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मिळालेली मते ही भाजपच्या विजयी उमेदवाराला मिळालेल्या मतांच्या जवळपासच आहेत. कळमकर यांना अधिक फायदा झाला असता. आकडेवारीतून काही शक्‍यता निर्माण झाल्या असतील; पण भाजपने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला जिंकला, हे मान्यच करायला लागेल.

Web Title: BJP national congress party opening of the Citadel