भाजपला शहराविषयी आस्थाच नाही - अजित पवार 

ajitpawar
ajitpawar

पिंपरी - पिंपरी- चिंचवडमध्ये यायला नको म्हणून येथील "पीएमआरडीए'चे कार्यालयही शहरातून हलविण्यात आले. आम्ही सत्तेत आल्यावर सर्व शासकीय कार्यालये शहरात आणू. भाजपला या शहराविषयी आस्थाच नाही, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. 

पिंपरीत गुरुवारी (ता. 2) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी महापौर शकुंतला धराडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, पक्षनेत्या मंगला कदम, योगेश बहल, अजित गव्हाणे, नाना काटे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ""शहरातून फिरताना भाजपची "अब की बार भाजप सरकार' ही जाहिरात पाहिली. सरकार फक्‍त केंद्रात आणि राज्यात असते. महापालिकेच्या निवडणुकीत सरकार नसते, हे देखील भाजपला माहिती नाही,'' असे सांगत त्यांची खिल्ली उडविली. पवार म्हणाले, ""शहरात निर्णयप्रक्रिया राबविताना सर्वांना विचारात घेऊनच निर्णय घेतला जातो. माजी आमदार अण्णा बनसोडे यांची नाराजी असल्याने त्यांना चर्चेसाठी बोलावून घेतले. आत्तादेखील काही कामासाठी आपण त्यांना पाठविले असल्याने ते पत्रकार परिषदेस येऊ शकले नाहीत.'' 

पवार म्हणाले, ""शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडली असून, कार्यालयातच खुनासारख्या गंभीर घटना घडत आहेत, हे राज्य सरकारचे अपयश आहे. ज्यांनी शहरातील भाजप नगरसेवकांची संख्या वाढविली, त्या अंकुश लांडगे यांच्या मारेकऱ्यांना अभय, हे कशाचे प्रतीक आहे? भाजप हा गुंडांचा पक्ष आहे.'' 

पवार म्हणाले, ""कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडीबाबत आमची पुन्हा एकदा बैठक सुरू आहे. गेल्या निवडणुकीत 128 पैकी 93 जागी आमचे नगरसेवक निवडून आले होते, तर कॉंग्रेसचे 14 जागी नगरसेवक निवडून आले. याचे प्रमाण काढले तर 18 जागा कॉंग्रेसला मिळाल्या असत्या. मात्र, राउंड फिगर करण्यासाठी आम्ही आणखी दोन जागा त्यांना वाढवून दिल्या आहेत. आघाडीबाबत पुण्यातही बैठक झाली असून तिथे 100 जागांवर एकमत झाले आहे. आघाडीबाबत प्रदेश स्तरावर बोलणी झाली आहेत. पिंपरी- चिंचवड शहरातही आमची चर्चा सुरू आहे. ज्या ठिकाणी एकमत होणार नाही तिथे आम्ही मैत्रीपूर्ण लढत देऊ. आगामी महापालिका निवडणुकीसाठी शरद पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, चित्रा वाघ आणि दिलीप वळसे पाटील हे आमचे स्टार प्रचारक असणार आहेत.'' 

आज दुपारी तीननंतरच यादी 
""निवडणुकीत चुरस निर्माण झाल्याने प्रथमच राजकीय पक्षांनी शेवटच्या दिवसापर्यंत आपल्या उमेदवारी याद्या लांबविल्या आहेत. यातूनही बंडखोरी होणार असून जो पक्ष बंडखोरी रोखण्यात यशस्वी होईल, तोच विजय प्राप्त करणार आहे. शुक्रवारी एबी फॉर्म देणार असून दुपारी तीन वाजल्यानंतरच अधिकृत उमेदवारांची यादी घोषित करू.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com