इन्कमिंगमध्ये भाजप नंबर वन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 डिसेंबर 2016

पुणे - इन्कमिंग-आउटगोइंगच्या खेळातील पहिल्या फेरीत तरी भारतीय जनता पक्षानेच बाजी मारली असून, या पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी इतर पक्षांतील तब्बल बारा नगरसेवक इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे जायला तीन, तर शिवसेनेत प्रवेश मिळवायला दोन जण इच्छुक आहेत. मात्र, एकेकाळी ज्या पक्षाची उमेदवारी म्हणजे निवडून यायची हमी असे मानले जात असे, त्या काँग्रेसची पाटी मात्र कोरीच आहे.

पुणे - इन्कमिंग-आउटगोइंगच्या खेळातील पहिल्या फेरीत तरी भारतीय जनता पक्षानेच बाजी मारली असून, या पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी इतर पक्षांतील तब्बल बारा नगरसेवक इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे जायला तीन, तर शिवसेनेत प्रवेश मिळवायला दोन जण इच्छुक आहेत. मात्र, एकेकाळी ज्या पक्षाची उमेदवारी म्हणजे निवडून यायची हमी असे मानले जात असे, त्या काँग्रेसची पाटी मात्र कोरीच आहे.

काँग्रेसचे चार नगरसेवक भाजपच्या, तर तीन नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असून, मनसेचेही चार नगरसेवक भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादीचे नगरसेवक पिंटू धावडे, मनसेचे राजाभाऊ लायगुडे, राजू बराटे यांचीही भूमिका अद्याप निश्‍चित झालेली नाही. रवींद्र धंगेकर यांचा भाजप प्रवेश निश्‍चित सांगण्यात येत आहे, तर काँग्रेसचे मिलिंद काची आता शिवसेनेच्या वाटेवर आहेत. काँग्रेसचे मुकारी अलगुडे, अभिजित कदम, बंडू गायकवाड, कैलास गायकवाड, अश्‍विनी जाधव, वैशाली मराठे, शीतल सावंत यांच्याबद्दल सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. त्यात भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वाटेवर ते असल्याचे म्हटले जात आहे. याबद्दल विचारणा केली असता, या सर्वांनी ‘आम्ही सध्या आमच्याच पक्षात आहोत’, असे सांगून चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. परंतु, काँग्रेस आणि मनसेतील सूत्रांनी या संभाव्य प्रवेशाला दुजोरा दिला असून, आम्हीही ‘वेट अँड वॉच’ करीत आहोत, असे त्यांनी सांगितले. माजी महापौर दत्ता गायकवाड यांच्याही भूमिकेकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 

काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी किंवा माजी नगरसेवक आणण्यासाठी भाजपचे खासदार संजय काकडे यांच्याबरोबरच आमदार भीमराव तापकीर, योगेश तापकीर, पक्षाचे महापालिकेतील गटनेते गणेश बिडकर आदी प्रयत्नशील आहेत.

प्रवेशासाठी इच्छुक मध्यस्थांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट आदींशी भेटीगाठी घेत आहेत. सरत्या महापालिकेचा कार्यकाळ संपण्यास एक महिना राहिला आहे. 
त्यामुळे महिनाअखेरपर्यंत निर्णय जाहीर करायचा नाही, असेही ठरत आहे. त्यानंतर नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन अधिकृत पक्ष प्रवेश करायचा, अशीही स्ट्रेटेजी ठरत आहे. भाजपमध्ये प्रवेश न मिळाल्यास राष्ट्रवादी किंवा शिवसेनेकडूनही इच्छुकांची चाचपणी सुरू आहे.

उमेदवारांकडून चाचपणी
महापालिका निवडणूक जवळ आल्यामुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरवात झाली असून, उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षांतराच्या घडामोडींना वेग येऊ लागला आहे. महापालिकेतील १७ नगरसेवक भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून उमेदवारी मिळेल का, याची चाचपणी करीत आहेत. येत्या आठ दिवसांत त्याबाबतचे चित्र स्पष्ट होण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: bjp number one in incoming