भाजप विरोधकांची घोषणाबाजी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

कार्यकारिणी बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर दोनदिवसीय उपोषणास सुरवात

पिंपरी - भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर विरोधकांच्या ‘आश्‍वासनांची आठवण’ उपोषण व धरणे आंदोलनाला बुधवारी (ता. २६) सकाळी सुरवात झाली. या आंदोलनाला विरोधी पक्षांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. या वेळी झालेल्या घोषणाबाजीमुळे चिंचवड स्टेशनचा परिसर दणाणून गेला.

कार्यकारिणी बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर दोनदिवसीय उपोषणास सुरवात

पिंपरी - भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर विरोधकांच्या ‘आश्‍वासनांची आठवण’ उपोषण व धरणे आंदोलनाला बुधवारी (ता. २६) सकाळी सुरवात झाली. या आंदोलनाला विरोधी पक्षांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. या वेळी झालेल्या घोषणाबाजीमुळे चिंचवड स्टेशनचा परिसर दणाणून गेला.

चिंचवड स्टेशन येथील महावीर चौकात बुधवारी सकाळी साडेदहा वाजता लहूजी वस्ताद व आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून उपोषणाला सुरवात झाली. काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन, पिंपरी चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते योगेश बहल, राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर मंगला कदम, डॉ. वैशाली घोडेकर, शिवसेनेचे मारुती भापकर, राष्ट्रवादीचे फजल शेख, विजय लोखंडे, स्वराज अभियानाचे मानव कांबळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, भारिपचे देवेंद्र तायडे, एमआयएमचे शब्बीर शेख, आरपीआय (कवाडे) गटाचे रामदास ताटे, समाजवादी पक्षाचे रफिक कुरेशी, शेतकरी कामगार पक्षाचे हरेश मोरे, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, संभाजी बिग्रेडचे अभिमन्यू पवार, नागरी हक्क सुरक्षा समितीचे प्रदीप पवार, ओबीसी संघर्ष समितीचे विशाल जाधव, माकपचे अमित कांबळे, गणेश दराडे, मीनाक्षी उंबरकर, शकुंतला भाट, विश्रांती पाडळे, संगीता ताम्हाणे, गंगा धेंडे, मीना मोहिते, माई काटे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. 

भाजपची बैठक संपेपर्यंत उपोषण सुरूच राहणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, शेतकऱ्यांच्या उत्पादनांना हमीभाव मिळालाच पाहिजे, धनगर-मराठा-मुस्लिमांना आरक्षण मिळालेच पाहिजे. शास्तीकर पूर्णपणे माफ करा, अनियमित बांधकामे नियमित करा-नाहीतर खुर्ची खाली करा, अशा घोषणांनी चिंचवड स्टेशनचा परिसर दणाणून गेला होता. व्यासपीठाच्या दोन्ही बाजूला ऊस बांधण्यात आला होता. हमीभाव मिळावा यासाठी व्यासपीठावर कांदा, तूर, गहू आदीच्या टोपल्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.

पोलिसांच्या सूचनेनुसार आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहोत. मागण्यांचे निवेदन घेण्यासाठी जबाबदार व्यक्‍ती आंदोलनाच्या ठिकाणी पाठविण्यात येईल, असे आश्‍वासन पोलिसांनी दिले आहे. गुरुवारी दुपारी चार वाजेपर्यंत निवेदन घेण्यासाठी येणाऱ्याची वाट पाहू. कोणीही न आल्यास दुपारी चार वाजल्यानंतर भाजप कार्यकारिणीच्या समारोपात घुसून निवेदन देऊ. या वेळी होणाऱ्या सर्व प्रकाराला भाजप व पोलिस यंत्रणा जबाबदार राहील.
- मारुती भापकर, विरोधकांच्या आंदोलनाचे प्रमुख

Web Title: bjp oppose announcing