चंद्रकांत पाटीलही मुख्यमंत्री पदाच्या तयारीत

ज्ञानेश्‍वर बिजले
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

पक्ष म्हणाला मुख्यमंत्री व्हा तर... "मग, मी काय सोडणार काय?,' असे पत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तर देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री पदी विराजमान होण्याची तयारी दर्शविली.

पुणे ः पक्ष म्हणाला मुख्यमंत्री व्हा तर... "मग, मी काय सोडणार काय?,' असे पत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तर देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री पदी विराजमान होण्याची तयारी दर्शविली. शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचे म्हणत आहेत, त्यांची क्षमता आहे का, या प्रश्‍नावर पाटील उत्तरले, ""लोकशाहीत लोक ठरवतील.'' 

एकट्याच्या ताकदीवर दोनशे जागा येणार असल्या तरी, युती होणारच, असे ठासून सांगताना पाटील म्हणाले, की सत्तेचेही समान वाटप होईल. भाजपमध्ये होणाऱ्या मेगाभरतीवर भाष्य करताना, ते म्हणाले,""मेगाभरती हा शब्दप्रयोग तुम्ही केला आहे. आम्ही म्हटले नाही. हाऊसफूलचा बोर्ड लागला, तरी चित्रपटगृहात दहा तिकीटे ठेवतो ना. तसेच आणखी काहीजण येतील. शरद पवार यांनी त्याची मानसिक तयारी ठेवावी.'' 

भाजपचे गेल्या निवडणुकीत 122 आमदार निवडून आले. अन्य पक्षातून आलेल्यांना उमेदवारी दिली असली, तरी शंभर आमदार भाजपचेच कार्यकर्ते होते. मंत्रीमंडळातील 43 मंत्र्यांपैकी 13 जण शिवसेनेचे होते. उर्वरीत 30 मंत्री हे मूळ भाजपमधील नेते होते, बाहेरच्यांना मंत्रीपद दिले नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले. बाहेरच्यापैकी राधाकृष्ण विखे पाटील यांनाच मंत्री केले. त्यांची तीन पिढ्यांची परंपरा आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही. पक्षात प्रवेश देताना आम्ही तावून सुलाखूनच प्रवेश देतो, असा दावा त्यांनी केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मार्गदर्शन करते. तावून सुलाखून माणसे पक्षात घ्या, असे त्यांनी सांगितल्याची माहिती पाटील यांनी दिली. 
बारामतीतून तुम्ही लढणार का, अशी विचारणा केली असता, पाटील म्हणाले, ""मला पराभव माहिती नाही. पक्षाने सांगितले, तर बारामतीच काय गडचिरोलीतूनही लढेन. मी स्वतः कशालाही इच्छुक नाही. पक्ष सांगेल, ती जबाबदारी पार पाडीन.'' 

अन्य पक्षांतील ज्या लोकांना तुम्ही पक्षात घेत आहात, त्यांच्या साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांचे पैसे दिले नाहीत, काहीजणांविरुद्ध कारवाई सुरू आहे, अशी विचारणा केली असता, पाटील म्हणाले, ""ती कारवाई होईल. मात्र, त्यांची सोशल रिस्पॉन्सिबिलीटी म्हणून केलेले काम लक्षात घेऊन त्यांना पक्षात प्रवेश दिला.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP President Chandrakant Patil Also race in CM candidate