पुण्यात भाजप नगरसेवकांना 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार', का?

मंगेश कोळपकर 
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

"तुम्ही बघा', असाही निरोप त्यांच्यापर्यंत दिला जात आहे. विधानसभा झाल्यावर दोन वर्षांत महापालिका निवडणूक आहे. त्यात उमेदवारी कायम ठेवण्यात आमदारांचा सहभाग असतो. त्यामुळे नगरसेवकांना नाईलाजाने त्यांचा आदेश ऐकावा लागत आहे. ही बाब कोठे बोलताही येत नसल्यामुळे तोंड दाबून बुक्‍यांचा मार सहन करावा लागत आहे, अशीही भावना काही जणांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.

पुणे : उमेदवारांचा प्रचार करताना पदरमोड करावी लागत असल्यामुळे शहरातील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक त्रस्त झाले आहेत. हे दुखणे कोणाला सांगता येत नसल्यामुळे तोंड दाबून बुक्‍यांचा मार सहन करावी लागत असल्याची भावना काही नगरसेवकांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. 

शहरातील आठही विधासनभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. त्यातील माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, जगदिश मुळीक, यांची उमेदवारी कायम राहिली आहे तर, कसब्यात मुक्ता टिळक, कॅंटोन्मेंटमध्ये सुनील कांबळे आणि शिवाजीनगरमध्ये सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी मिळाली आहे. तर राज्याच्या सरकारमधील दोन नंबरचे मंत्री आणि पालकमंत्री कोथरूडमधून निवडणूक लढवित आहेत. शहरात भाजपचे महापालिकेत 100 नगरसेवक आहेत. जवळजवळ प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भाजपचे 10 पेक्षा जास्त नगरसेवक आहेत. त्यामुळे अर्थातच "डोअर टू डोअर' प्रचारासाठी नगरसेवकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच प्रभागात मेळावे, कोपरा सभा, रॅली आयोजित करणे आदी कामे नगरसेवकांकडे दिली जात आहेत. नेत्यांच्या सभांसाठी गर्दी जमविणे, त्यासाठी उपस्थित राहणाऱ्या मतदार, नागरिकांची वाहतूक करणे आदींचाही त्यात समावेश आहे. मात्र, यासाठीचा खर्च संबंधित नगरसेवकांनाच करावा लागत आहे.

"तुम्ही बघा', असाही निरोप त्यांच्यापर्यंत दिला जात आहे. विधानसभा झाल्यावर दोन वर्षांत महापालिका निवडणूक आहे. त्यात उमेदवारी कायम ठेवण्यात आमदारांचा सहभाग असतो. त्यामुळे नगरसेवकांना नाईलाजाने त्यांचा आदेश ऐकावा लागत आहे. ही बाब कोठे बोलताही येत नसल्यामुळे तोंड दाबून बुक्‍यांचा मार सहन करावा लागत आहे, अशीही भावना काही जणांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.

या पूर्वीच्या निवडणुकांत संबंधित उमेदवार खर्चाची जबाबदारी उचलत असे. परंतु, आता "तुम्ही जरा एवढे करा', असे सांगितले जात आहे. त्यामुळे भाजपचे अनेक नगरसेवक त्रस्त झाले आहेत. एका मतदारसंघात तर, नगरसेवकांना विधानसभेच्या प्रचारासाठी विशिष्ट रकमेची तयारी करून ठेवायला सांगितली आहे. तर, एका उमेदवाराने मताधिक्‍य कमी झाले तर, महापालिकेच्या वेळी बघून घेतो, असेही सांगितल्याचे काही नगरसेवकांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP top leaders orders to corporaters in Pune