भाजप बहुमतापासून दूरच राहील - आंबेडकर

भाजप बहुमतापासून दूरच राहील - आंबेडकर

पुणे - लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवून आम्हीच सत्तेत येणार, हा भाजपच्या नेत्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटेल, असे सांगत भाजप बहुमताच्या जवळपासही जाणार नाही, असे भाकीत वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पुण्यात केले. महाआघाडी आणि महायुती एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. 

महात्मा बसवेश्‍वर यांच्या जयंतीनिमित्त बाजीराव रस्त्यावरील बसवेश्‍वर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंबेडकर यांनी अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. डॉ. अरुणा माळी. लक्ष्मण माने, शिवानंद हैबतपुरे यांच्यासह वंचित आघाडीचे स्थानिक नेते उपस्थित होते. 

आंबेडकर म्हणाले, ‘‘या निवडणुकीत भाजपला पुन्हा सत्ता मिळण्याची आशा आहे. मात्र, तसे होणार नाही. सरकारला जनता विटली आहे. त्यामुळे भाजपला बहुमत मिळणार नाही. तशा आकड्यांच्या जवळही हा पक्ष पोचणार नाही.’’

देशात विषमता वाढली
आंबेडकर म्हणाले, ‘‘देशात विषमता वाढली आहे. ती संपविण्यासाठी आता समतेची जीवनशैली स्वीकारण्याची गरज आहे. त्यातून वंचित आघाडी उभी राहिली. त्यामुळे महाराष्ट्रात परिर्वतनाची सुरवात झाली आहे. ज्या काळात दलित, शोषित आणि वंचितांना कोणताही अधिकार नव्हता, त्या वेळी महात्मा बसवेश्‍वर यांनी या घटकांना न्याय दिला.’’ महात्मा बसवेश्‍वर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन सभेत आंबेडकर बोलत होते. भारिप-बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष अतुल बहुले, माजी नगरसेवक लक्ष्मण आरडे, अनिता चव्हाण आदी उपस्थित होते.

दुष्काळी भागाचा दौरा करणार
‘‘राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील परिस्थिती हाताबाहेर जात आहे. मात्र, त्याचे कोणालाही सोयरसुतक राहिलेले नाही. या भागातील नेमकी परिस्थिती जाणून घेण्यासाठी मी दौरा करणार आहे. परंतु, त्याचे कोणतेही मार्केटिंग मी करणार नाही,’ असेही आंबेडकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com