बारामतीत भाजप महिला आघाडीने केले शौचालयासाठी उपोषण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

भाजप महिला आघाडीच्या वतीने शहरात स्वच्छतागृह व शौचालयांच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणात काल यशस्वी मध्यस्थी झाल्याने महिलांनी उपोषण मागे घेतले.

बारामती शहर-  भाजप महिला आघाडीच्या वतीने शहरात स्वच्छतागृह व शौचालयांच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणात बुधवारी (ता. 17) यशस्वी मध्यस्थी झाल्याने महिलांनी उपोषण मागे घेतले.

बारामती शहरात विविध दहा ठिकाणी नवीन स्वच्छतागृह व शौचालय उभारणीची मागणी मुख्याधिकारी योगेश कडुसकर यांनी मान्य केल्यानंतर महिलांनी उपोषण मागे घेतले.

बारामतीत स्वच्छतागृह व शौचालयांच्या मागणीसाठी भाजप महिला आघाडीच्या वतीने गेले दोन दिवस उपोषण सुरू होते. आज भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाच्या सचिवांना याबाबत निर्देश दिले. त्यानंतर कडुसकर यांनी सद्यःस्थिती अहवाल व वाढीव उपाययोजना, याबाबत उपोषणकर्त्यांना भेटून पत्र दिले. उपोषणकर्त्यांनी दहा ठिकाणी स्वच्छतागृह उभारणीचा प्रस्ताव दिला होता. 

काल सकाळी बाळासाहेब गावडे यांनी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे व मुख्याधिकारी कडुसकर यांच्याशी चर्चा केली. दोघांनीही याबाबत योग्य तो धोरणात्मक निर्णय घेऊन कार्यवाहीची ग्वाही दिली. त्यांच्या लेखी आश्वासनानंतर सुनीता झेंडे, स्वाती कुलकर्णी, सारिका लोंढे, लक्ष्मीताई मोरे या उपोषणकर्त्यांनी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, कांचन कुल, मुख्याधिकारी कडुसकर, गटनेते सचिन सातव यांच्या हस्ते फळांचा रस घेत उपोषण सोडले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP women behind the leading fast in baramati