भाजपने दिला आरपीआयला जिंकण्याचा मंत्र - सुहास कुलकर्णी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

पुणे - आपापले प्रभाग, मतदार यादी आणि मतदारांचा अभ्यास किती जणांनी केला? वैयक्तिक गाठीभेटी सुरू केल्या का? यासारखे असंख्य प्रश्‍न उपस्थित करत रिपब्लिकन पक्षाच्या इच्छुक उमेदवारांना (आठवले गट) महापालिका निवडणूक जिंकण्याचा मंत्र देण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक सुहास कुलकर्णी यांनी या इच्छुकांना मार्गदर्शन केले.  

पुणे - आपापले प्रभाग, मतदार यादी आणि मतदारांचा अभ्यास किती जणांनी केला? वैयक्तिक गाठीभेटी सुरू केल्या का? यासारखे असंख्य प्रश्‍न उपस्थित करत रिपब्लिकन पक्षाच्या इच्छुक उमेदवारांना (आठवले गट) महापालिका निवडणूक जिंकण्याचा मंत्र देण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक सुहास कुलकर्णी यांनी या इच्छुकांना मार्गदर्शन केले.  

रिपब्लिकन पक्षातर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या मुलाखतींमधील इच्छुकांसाठी टिळक रस्त्यावरील मराठा चेंबरच्या सभागृहात प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या वेळी शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, पक्षाचे राष्ट्रीय कोशाध्यक्ष एम. डी. शेवाळे, राज्य उपाध्यक्ष नवनाथ कांबळे, बाळासाहेब जानराव, नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे, हनुमंत साठे, महेश शिंदे, अशोक कांबळे, असित गांगुर्डे, मंदार जोशी उपस्थित होते.

कुलकर्णी म्हणाले, ‘‘भाजप, शिवसेना आणि रिपब्लिकन पक्ष महायुतीमध्ये आहे. त्या दृष्टीने आपण निवडणुकीची तयारी केली पाहिजे. प्रत्येक उमेदवाराच्या पाठीशी कार्यकर्त्यांची भक्कम फळी असणे आवश्‍यक आहे. प्रभागाची निवडणूक लढताना दमछाक होते. त्यावर ‘पॅनल सिस्टीम’ हाच सर्वोत्तम पर्याय आहे. चारही उमेदवारांनी ‘मीपणा’ सोडून एकत्रित काम करण्यावर भर द्यावा. केंद्र आणि राज्य सरकारने आरोग्य, पेन्शन, घरकुलासारख्या असंख्य योजना आणल्या. या योजना जनतेपर्यंत पोचविण्याचे काम करावे.’’

शेवाळे म्हणाले, ‘‘इच्छुकांपैकी काहींना तिकीट मिळेल आणि काहींना मिळणार नाही. तिकीट मिळाले नाही, म्हणून काम करणार नाही, ही वृत्ती सोडून प्रत्येकाने पक्षासाठी काम करावे. इच्छुकांच्या नाराजीचा परिणाम पक्षावर होऊ देऊ नका. अनेक वर्षांनंतर पक्षाला चांगले यश मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे प्रत्येकाने झटून काम करण्याची गरज आहे.’’ डॉ. धेंडे यांनी कायदेशीर प्रक्रिया, तांत्रिक बाबी आणि निवडणूक प्रक्रिया इच्छुकांना समजावून सांगितली. अशोक कांबळे यांनीही निवडणुकीविषयी मार्गदर्शन केले. 

भाजपच्या शिस्तीत झाले शिबिर
पक्षशिस्तीसाठी खास ओळखल्या जाणाऱ्या भाजपच्या शिस्तीत इच्छुकांचे हे शिबिर झाले. त्यामुळे कार्यक्रम वेळेत सुरू झाला आणि वेळेतच संपला. या शिबिरासाठी उपस्थित इच्छुक शांतपणे सारे काही ऐकत होते आणि महत्त्वाचे मुद्दे नोंदवून घेत होते. भाजपबरोबर राहिल्यामुळे शिस्तीचा गुणही रिपब्लिकनमध्ये उतरू लागल्याची चर्चा या वेळी रंगली होती. 

Web Title: The BJP won the RPI formula