पुण्यात प्रेयसीला धडा शिकविण्यासाठी स्फोट 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

...अशी घडली घटना 
किशोर याचे मोबाईल दुरुस्तीचे दुकान आहे, तर त्याचा मावसभाऊ हा कुत्र्यांना मारण्यासाठी, शिकारीसाठी छोट्या प्रकारचे बॉंब बनवित होता. दरम्यान किशोरची मावशी धायरी-डीएसके विश्‍व परिसरात राहण्यास होती. त्याचे मावशीकडे वारंवार जाणे होत असे. त्यातूनच मावशीच्या शेजारी राहणाऱ्या तरुणीबरोबर त्याचे प्रेमसंबंध जुळले. दोन वर्षांनंतर त्यांचा "ब्रेकअप' झाला. त्यानंतर तिने किशोरबरोबर भेटणे, बोलणे टाळले. किशोरला हे सहन न झाल्याने अखेर त्याने प्रेयसीला धडा शिकविण्याचे ठरविले. त्यानुसार त्याचा मावसभाऊ शिकारीसाठी, कुत्र्यांना मारण्यासाठी 
छोट्या आकाराचे "डुक्कर बॉंब' बनवित असे. त्याच्याकडून किशोरने माहिती घेतली. फटाक्‍याची दारू एका छोट्या बॉक्‍समध्ये ठेवून बॉंब बनविला. त्यानंतर अक्षयच्या मदतीने त्याने बुधवारी पहाटे प्रेयसीच्या घराच्या खिडकीजवळ त्या बॉंबचा स्फोट घडवला. 
 
पुणे : खरं तर प्रेयसीसाठी वाट्टेल ते करणारे अनेक प्रेमवीर असतात... प्रेमभंग पचविण्यासाठी "कायं पण' करणारेही अनेक आहेत... पण एका प्रियकराने मात्र "ब्रेकअप' झाल्यानंतर प्रेयसीला धडा शिकविण्यासाठी थेट बॉंबस्फोटच घडविला! त्याच्या या अजब प्रेमाच्या "गजब' शेवटाने पुणेकरांची मात्र पहाटेची साखरझोप उडविली. बुधवारी पहाटे धायरी रस्ता-डीएसके विश्‍व परिसर बॉंबस्फोटाने हादरल्याची घटना घडली होती. पोलिसांनी तपास केल्यानंतर "ब्रेकअप'मुळे प्रियकराने छोटा बॉंब बनवून हा प्रकार घडविल्याचे उघडकीस आले. 

किशोर आत्माराम मोडक (वय 30) व अक्षय राजाभाऊ सोमवंशी (वय 24, रा. वडकी, सासवड रस्ता) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास मोठ्या स्फोटाच्या आवाजाने डीएसके विश्व परिसर हादरला. यामुळे परिसरातील एका सोसायटीतील सदनिकेची काच फुटली होती. पोलिसांनी पाहणी केल्यानंतर तेथे छर्रे आढळून आल्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य वाढले. 

सीसीटीव्ही चित्रीकरणात एका कारमधून आलेले दोघेजण बॉंबसदृश्‍य वस्तू घराच्या खिडकीवर फेकत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी वडकी येथील कारचा शोध घेतला, त्यानंतर मोडक व सोमवंशी यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. पोलिस निरीक्षक सरदार पाटील, गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक संगीता यादव, महिला सहायक पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी, गिरीश सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

...अशी घडली घटना 
किशोर याचे मोबाईल दुरुस्तीचे दुकान आहे, तर त्याचा मावसभाऊ हा कुत्र्यांना मारण्यासाठी, शिकारीसाठी छोट्या प्रकारचे बॉंब बनवित होता. दरम्यान किशोरची मावशी धायरी-डीएसके विश्‍व परिसरात राहण्यास होती. त्याचे मावशीकडे वारंवार जाणे होत असे. त्यातूनच मावशीच्या शेजारी राहणाऱ्या तरुणीबरोबर त्याचे प्रेमसंबंध जुळले. दोन वर्षांनंतर त्यांचा "ब्रेकअप' झाला. त्यानंतर तिने किशोरबरोबर भेटणे, बोलणे टाळले. किशोरला हे सहन न झाल्याने अखेर त्याने प्रेयसीला धडा शिकविण्याचे ठरविले. त्यानुसार त्याचा मावसभाऊ शिकारीसाठी, कुत्र्यांना मारण्यासाठी 
छोट्या आकाराचे "डुक्कर बॉंब' बनवित असे. त्याच्याकडून किशोरने माहिती घेतली. फटाक्‍याची दारू एका छोट्या बॉक्‍समध्ये ठेवून बॉंब बनविला. त्यानंतर अक्षयच्या मदतीने त्याने बुधवारी पहाटे प्रेयसीच्या घराच्या खिडकीजवळ त्या बॉंबचा स्फोट घडवला.

Web Title: blast in Dhayri area Pune