आरोग्यासाठी बहुगुणी ठरणारा निळा भात आता आंबेगाव तालुक्यात !

निळ्या भातामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट आणि अँथोसायनिन असतात. पांढर्‍या भातापेक्षा निळ्या भातात चरबी कमी असल्याने आरोग्यदायी आणि फायदेशीर आहे.
ambegaon
ambegaonsakal media

फुलवडे : आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील फुलवडे, बोरघर, दिगद, आमडे, जांभोरी, चिखली व मापोली येथील शेतकऱ्यांनी आंबेगाव कृषी विभागाच्या सहकार्याने जवळपास २० गुंठ्यात आसाम आणि इंडोनेशियात पिकविल्या जाणाऱ्या निळ्या भाताची लागवड केली असून सध्या ही शेते काळ्या ओंब्यांनी बहरली आहेत. आसाम आणि इंडोनेशियतून आलेल्या या निळ्या भाताची लागवड भारतात फारच कमी आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात तर आता पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात या निळ्या भाताची लागवड केली गेली असून या धानाला मोठ्या प्रमाणात काळ्या ओंब्या आल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह वाढला आहे. भारतीय बाजारपेठेत निळ्या तांदळाचा भाव २५० रुपये प्रती किलोपासून सुरू होतो.

आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील गंगाराम हिले (फुलवडे), संतोष फलके (बोरघर), शामराव दांगट (दिगद), सिताराम असवले (आमडे), लिंबाजी केंगले (जांभोरी), विजय आढारी (चिखली), अनंत लोहकरे, रामचंद्र लोहकरे, पांडुरंग लोहकरे, लक्ष्मण लोहकरे (मापोली) या शेतकऱ्यांनी निळ्या भाताची लागवड केली असून या धानाला मोठ्या प्रमाणात काळ्या ओंब्या आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. निळ्या भाताचे उत्पादन ११० दिवसात घेतले जात असल्याने दुसऱ्या पिकांसाठी जमीन उपलब्ध होत असल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पीक घेणे सुद्धा सहज शक्य होणार आहे. शेतातील धानाचे लोंबी बघता पारंपरिक धानापेक्षा निश्चितच जास्त उत्पादन होईल असा विश्वास फुलवडे येथील माजी पोलिस पाटील तसेच पुणे जिल्ह्यातून भात शेतीत प्रथम क्रमांक मिळविलेले प्रगतशील शेतकरी गंगाराम लिंबाजी हिले यांनी व्यक्त केला.

निळ्या भातामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट आणि अँथोसायनिन असतात. पांढर्‍या भातापेक्षा निळ्या भातात चरबी कमी असल्याने आरोग्यदायी आणि फायदेशीर आहे. या भातामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात. ते आपल्या शरीरातील दूषित घटक स्वच्छ करतात. तसेच आपले वजन कमी करण्यात देखील खूप उपयुक्त असून बर्‍याच रोगांवरही हा भात फायदेशीर आहे. निळ्या भातामध्ये सापडलेला अँथोसायनिन रक्तातील साखर नियंत्रित करतो. १०० ग्रॅम निळ्या भातामध्ये साधारणतः ४.५ ग्रॅम फायबर असते जे आपले पचन अधिक चांगले राखण्यास मदत करते. याशिवाय डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. या भातावर संशोधन होऊन औषधी गुणधर्म, उत्कृष्ट गुणवत्ता असलेले वनस्पतीयुक्त प्रोटीन असल्यामुळे कॅन्सरसह विविध आजारासाठी हा भात निश्चितच गुणकारी असल्याचे सिद्ध झाले आहे.

"महाराष्ट्रातून प्रथम अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातून या निळया तांदळाची लागवड सुरू झाल्याने नावीन्यपूर्ण बाब म्हणून हे बियाणे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना देण्यात आले होते. या वाणाची वाढ चांगली असून परिसरात हे प्लॉट कुतूहल ठरत आहेत. पुढील काळात निळ्या तांदळाच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ होईल." - टी. के. चौधरी, तालुका कृषी अधिकारी आंबेगाव.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com